लोडशेडिंगच्या नावाखाली जनतेची ससेहोलपट !

अन्यथा महावितरणच्या कारभाराविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन – डॉ. जयश्री थोरात 

संगमनेर | प्रतिनिधी 

संगमनेर शहरासह ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांच्या संयमाचा बांध अखेर फुटला. लोडशेडिंगच्या नावाखाली वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्याचा आरोप करत काँग्रेसच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. “वीज ही मूलभूत गरज असताना नागरिकांना अंधारात ठेवण्याचा प्रकार असह्य झाला आहे,” अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.

महावितरणला दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तालुक्यातील अनेक भागात दररोज सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात आहे. हीच वेळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासाची, शेतकऱ्यांच्या दूध व्यवसायाची आणि व्यापाऱ्यांच्या कामकाजाची असल्याने त्याचे गंभीर परिणाम होत आहेत. पावसाळ्यात लवकर अंधार पडत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना गोठ्यातील कामे अंधारात करावी लागत असून लघुउद्योजक आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वारंवार खंडित होणारा आणि कमी दाबाने होणारा वीजपुरवठा हा केवळ तांत्रिक प्रश्न नसून जनजीवनावर परिणाम करणारा गंभीर विषय बनल्याचा आरोप करण्यात आला.

मोर्चानंतर महावितरणचे कार्यकारी अभियंता वट्टमवार यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी नागरिकांच्या मागण्या ऐकून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, अर्चनाताई बालोडे, निखिल पापडेजा, वैष्णव मूर्तडक, सरपंच अमोल गुंजाळ यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

“वीजप्रश्नावर तातडीने निर्णय घ्या ; अन्यथा जनआंदोलन अटळ” – डॉ. जयश्री थोरात

“संगमनेर शहर आणि ग्रामीण भागातील वीजपुरवठ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. कमी दाबाने होणारा आणि वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरला आहे. महावितरणकडून ठोस कारणे किंवा प्रभावी उपाययोजना दिसत नाहीत. प्रशासनाने तातडीने परिस्थिती सुधारावी ; अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जाण्यास तयार राहावे लागेल, योग्य ती कार्यवाही झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा डॉ. जयश्री थोरात यांनी दिला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!