संगमनेरला बदनाम करण्याचा नवख्यांचा डाव — दुर्गाताई तांबे

नगरपालिका निवडणुकीत सपाटून मार खाल्ल्यामुळे वैफल्यग्रस्ततेतून आरोप

चौकशीतून दूध का दूध, पाणी का पाणी

तोंडाच्या वाफा दवडणारे तोंडघाशी पडतील

संगमनेर | प्रतिनिधी –

निळवंडे धरणातून संगमनेर शहरासाठी राबविण्यात आलेल्या थेट पाईपलाईन योजनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या योजनेत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी आक्रमक भूमिका घेत, “कोणतीही चौकशी करा, आम्ही तयार आहोत. चौकशीतून दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल,” असे ठाम आव्हान दिले.

तांबे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले की, संगमनेर शहराची राज्यपातळीवर बदनामी करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून जाणीवपूर्वक सुरू आहे. नगरपालिका निवडणुकीतील पराभवानंतरच्या वैफल्यातून तथ्यहीन आरोप करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘योजना पूर्णपणे कायदेशीर, सर्व मंजुऱ्यांनंतरच काम’

थेट पाईपलाईन योजनेस २००९ मध्ये नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणासह संबंधित विभागांची आवश्यक मंजुरी मिळाली होती. शासनाच्या निर्देशांनुसार प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करूनच कार्यादेश देण्यात आला होता, असा दावा करण्यात आला आहे.

या योजनेची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण झाली असून संपूर्ण शहराला दाबाने पाणीपुरवठा सुरू आहे. कामाचे थर्ड पार्टी ऑडिट झाल्यानंतरच बिले अदा करण्यात आली असल्याने गैरव्यवहाराचे आरोप निराधार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.

‘चौकशीचे स्वागत ; सत्य समोर येईल’

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशाचे आम्ही स्वागत करतो. चौकशीतून सत्य समोर येईल आणि खोटे आरोप करणाऱ्यांचा पर्दाफाश होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

थेट पाईपलाईन योजनेवरून सुरू झालेला राजकीय संघर्ष आता चौकशीच्या टप्प्यावर पोहोचला असून, या चौकशीतून नेमके सत्य काय समोर येते याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!