संगमनेरला लवकरच मिळणार स्वतंत्र RTO कार्यालय ! 

आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

परिवहन मंत्र्यांचे अधिकाऱ्यांना सकारात्मक निर्देश

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

संगमनेर, अकोले आणि परिसरातील नागरिकांची वाहतूक व परिवहन संदर्भातील रखडलेली कामे आता जलद गतीने होणार आहेत. संगमनेर येथे स्वतंत्र उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सुरू व्हावे, या आमदार सत्यजित तांबे यांच्या अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर मोठे यश येताना दिसत आहे. या संदर्भात आमदार तांबे यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन चर्चा केली असता, त्यांनी संगमनेरसाठी स्वतंत्र RTO कार्यालयाचा प्रस्ताव तातडीने शासनाकडे सादर करण्याचे सकारात्मक निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

संगमनेर आणि अकोले या दोन्ही तालुक्यांचा विस्तार आणि वाढती वाहनसंख्या लक्षात घेता, स्थानिक नागरिकांना आरटीओ कामांसाठी सध्या दूरचा प्रवास करावा लागतो. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जातो. हीच गैरसोय लक्षात घेऊन आमदार सत्यजित तांबे यांनी शासनाच्या नव्याने निश्चित झालेल्या निकषांचा आधार घेत संगमनेर येथे स्वतंत्र आरटीओ कार्यालय स्थापन करण्याची आग्रही मागणी केली आहे.

या मागणीसाठी आमदार तांबे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने शासन दरबारी लढा देत आहेत. नुकत्याच झालेल्या भेटीदरम्यान, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आमदार तांबे यांच्या मागणीची दखल घेतली. नव्या शासन अध्यादेशानुसार (G.R.) संगमनेरच्या स्वतंत्र RTO कार्यालयाचा प्रस्ताव सकारात्मक पद्धतीने आणि तातडीने तयार करून तो मंजुरीसाठी शासनाकडे सादर करावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी उपस्थित संबंधित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे आता हे कार्यालय प्रत्यक्षात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

“संगमनेर, अकोले आणि परिसरातील नागरिकांना परिवहन सेवांसाठी होणारी गैरसोय दूर करणे हे माझे कर्तव्य आहे. जोपर्यंत हे स्वतंत्र RTO कार्यालय प्रत्यक्षपणे सुरू होऊन जनतेच्या सेवेत रुजू होत नाही, तोपर्यंत माझा हा पाठपुरावा असाच अविरत सुरू राहील.आमदार सत्यजित तांबे

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!