शबरी माता संघटनेच्या प्रदेशाध्यक्षांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
कोळवाडे येथील आदिवासी मेळाव्यात बाळासाहेब थोरात यांचा भाजपवर हल्लाबोल ; “काँग्रेस हा गोरगरिबांचा पक्ष”
संगमनेर | प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील कोळवाडे येथे आयोजित आदिवासी मेळाव्यात शबरी माता संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दीपक बर्डे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या कार्यक्रमात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस हा गोरगरिबांचा, आदिवासींचा आणि समतेचा विचार मांडणारा पक्ष असल्याचे सांगत भाजपवर जोरदार टीका केली.
जयहिंद आदिवासी आश्रमशाळेत शबरी माता संघटना व सकल आदिवासी समाज यांच्या वतीने आयोजित मेळाव्यात बोलताना थोरात म्हणाले की, आदिवासी व नाईकराजे समाज हा अत्यंत प्रामाणिक, कष्टाळू आणि विकासाभिमुख आहे. या समाजाची खरी प्रगती शिक्षणातूनच होणार असल्याने प्रत्येक मुलगा-मुलगी शिक्षणाच्या प्रवाहात यावी, यासाठी कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन जनजागृती करावी.

थोरात यांनी काँग्रेसच्या सामाजिक योगदानाचा उल्लेख करत राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या कार्याची आठवण करून दिली. काँग्रेसने नेहमीच गोरगरिबांच्या विकासासाठी काम केले असून आजही राहुल गांधी हे सर्वसामान्यांच्या हक्कासाठी संघर्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी भाजपवर निशाणा साधताना त्यांनी आरोप केला की, सत्ताधारी पक्ष जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणाचे राजकारण करत असून समाजात भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना संसद भवन व राम मंदिर उद्घाटन सोहळ्यापासून दूर ठेवणे हा आदिवासी समाजाचा अपमान असल्याचा आरोपही त्यांनी केला.

तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळावी या उद्देशाने १९९२ मध्ये जयहिंद आदिवासी आश्रमशाळा सुरू करण्यात आल्याचे सांगत, या शाळेतील अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे; मुलांना शिकवा आणि मोठे करा,” असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. त्यांनीही भाजपवर टीका करत गरीब आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांसाठी काम केले असून आगामी काळात तरुणांनी अधिक सक्रिय होऊन त्यांच्या नेतृत्वाला बळ द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

या मेळाव्यात प्रा. बाबा खरात, गिरीजा पिचड, सुनील मोरे, संदीप गायकवाड आदींनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुरज माळी यांनी केले, सूत्रसंचालन बाळकृष्ण गांडाळ यांनी तर आभार दिलीप बांबळे यांनी मानले. कार्यक्रमास संगमनेर तालुका व अहिल्यानगर जिल्ह्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
