कट्टा विकायला आला आणि एलसीबीच्या जाळ्यात अडकला ; गावठी कट्ट्यासह ४ जिवंत काडतुसे जप्त

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिंगार नाला परिसरात गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना ताब्यात घेतले. पथक भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत विकास कमल यादव हा गावठी कट्टा विक्रीसाठी भिंगार नाला परिसरात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून संशयितांची पाहणी केली.

यावेळी दोन इसम संशयास्पदरीत्या थांबलेले आढळून आले. पंचांसमक्ष छापा टाकून विकास कमल यादव (वय १८, रा. गंगापूर, ता. नखानूर, जि. मधुबनी, बिहार) आणि ओमकार अनिल शिंदे (वय २१, रा. भिंगार, अहिल्यानगर) यांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांची अंगझडती घेतली असता ५० हजार रुपये किमतीचे एक गावठी बनावटीचे पिस्तूल, २ हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे, ७ हजार रुपये किमतीची स्टील मॅगझीन व त्यामध्ये दोन जिवंत काडतुसे तसेच ६० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन, असा एकूण १ लाख १९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत गावठी पिस्तुलासह एकूण चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

दोन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. त्यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३१/२०२६, आर्म्स ॲक्ट कलम ३/२५, ७/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!