श्रीरामपूर विभागात पोलिसांचे ‘ऑल आऊट ऑपरेशन’
१२० आरोपींना अटक ; ९०० अजामीनपात्र वॉरंटची बजावणी
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
श्रीरामपूर पोलीस विभागाने ११ ऑगस्ट रोजी राबविलेल्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये फरार व पाहिजे आरोपींची धरपकड, अवैध शस्त्रांविरोधात कारवाई, गांजा जप्ती, अवैध दारूविक्री व वाहतूक, मटका-जुगार तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोठ्या प्रमाणावर कारवाई केली.
या विशेष मोहिमेत अनेक वर्षांपासून फरार, परागंदा व नजरेआड असलेल्या आरोपींना जेरबंद करण्यात आले. तसेच न्यायालयाकडून जारी करण्यात आलेल्या ९०० अजामीनपात्र वॉरंटची बजावणी करून संबंधित आरोपींना अटक करत न्यायालयासमोर हजर करण्यात आले. याशिवाय १४६ जामीनपात्र वॉरंटचीही बजावणी करण्यात आली.

दोन सराईत गुन्हेगारांकडून तलवारी जप्त
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगार कपील राजू पिंपळे (वय २८, रा. सुरेगाव, ता. कोपरगाव) याचा शोध घेत असताना त्याच्याकडे धारदार लोखंडी तलवार आढळली. त्याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियम १९५९ मधील कलम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याचप्रमाणे राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत यश विठ्ठल जगधने (वय २६, रा. कॉलेज रोड, मुंजोबानगर, राहुरी) याच्याकडूनही धारदार लोखंडी तलवार जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्धही शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

४ किलो गांजा आणि कार असा ५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जर्मन हॉस्पिटलच्या पाठीमागील उपाध्ये मळा परिसरात पोलिसांनी कारवाई करत विक्रीच्या उद्देशाने ठेवलेला ४ किलो गांजा जप्त केला. या कारवाईत गांजासह कार असा सुमारे ५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी मयुर राजेंद्र वाघ, रा. नेवासा आणि त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दारूबंदीचे ४० गुन्हे ; मटका-जुगाराचे १८ गुन्हे
ऑल आऊट ऑपरेशनदरम्यान अवैध दारूची विक्री व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध दारूबंदीचे ४० गुन्हे दाखल करून मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच अवैधरीत्या पैसे लावून मटका व जुगार खेळणाऱ्यांविरुद्ध १८ गुन्हे दाखल करण्यात आले.

३३८ समन्सची बजावणी ; वाहतूक नियमभंगाच्या ३२२ कारवाया
न्यायालयात प्रलंबित विविध प्रकरणांमध्ये ३३८ समन्सची निर्धारित वेळेत बजावणी करण्यात आली. त्यामुळे संबंधितांना न्यायालयात नियोजित तारखेला हजर ठेवण्यास मदत झाली.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्यान्वये ३२२ कारवाया करण्यात आल्या. यात बेशिस्त वाहनचालक, फॅन्सी नंबर प्लेट, ब्लॅक फिल्म, सीट बेल्ट न वापरणे आदींचा समावेश असून २ लाख ५ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तसेच दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध ३ ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ कारवाया करण्यात आल्या.
या संपूर्ण कारवाईस पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर सोमनाथ वाघचौरे, तसेच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर विभागातील सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी केली.
