भंगार दुकानांच्या आडून वाहन चोरीचा धंदा ? 

श्रीरामपुरात पोलिसांचा मोठा दणका ; ५० हून अधिक वाहने संशयाच्या भोवऱ्यात !

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क – 

शहर व परिसरात दुचाकी-चारचाकी वाहनांची तसेच त्यांच्या पार्ट्सची चोरी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ११ ऑगस्ट रोजी राबविण्यात आलेल्या ऑल आऊट ऑपरेशन व विशेष कोंबिंग मोहिमेदरम्यान शहरातील संशयित भंगार दुकानांची झडती घेण्यात आली. या कारवाईत अनेक वाहने तसेच वाहनांचे मोठ्या प्रमाणात पार्ट्स संशयास्पद स्थितीत आढळून आले असून, संबंधित भंगार दुकानांच्या मालकांविरुद्ध चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, चोरीची वाहने किंवा त्यांचे पार्ट्स विविध भंगार दुकानांमध्ये बेकायदेशीररीत्या विकले जात असल्याचा संशय असल्याने ही तपासणी करण्यात आली.

यारा टायर्समध्ये १४ संशयित वाहने

सुतगिरणी फाटा येथील यारा टायर्स या दुकानाची पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. दुकानमालक आसिफ दाऊद तांबोळी यांच्या ताब्यात १४ संशयित वाहने आढळून आली. यामध्ये इंडिगो, ओमिनी, सॅन्ट्रो, टाटा व्हिस्टा, टाटा मांझा, टाटा मेगा, लोगॉन, मॅजिक, स्ट्रीम, विंटो, टाटा झिप, इंडिगो, शेवरलेट व टाटा एस या वाहनांचा समावेश आहे.

याशिवाय चारचाकी वाहनांचे पांढऱ्या रंगाचे २६ दरवाजे, ग्रे रंगाचे ४ दरवाजे आणि २८ टायर्स आढळून आले.

डी.एम. टायर्स अँड गॅरेजमध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात पार्ट्स

रेल्वे फाटकाजवळील सुतगिरणी फाटा येथील डी.एम. टायर्स अँड गॅरेज येथे दुकानमालक फिरोज रसुल शहा यांच्या ताब्यात तीन ट्रॅक्टर, चारचाकी वाहनांची २५ इंजिने, ५० गिअर बॉक्स, १३० पांढरे दरवाजे, ३० लाल दरवाजे, एक अल्टो कार, तसेच मोठ्या प्रमाणात वाहनांचे काचा, टायर्स, लाईट आणि रेडिएटर आढळून आले. पोलिसांनी या ठिकाणी मिळालेल्या साहित्याचा पंचनामा केला आहे.

अनिस हारून शहा यांच्या दुकानातही संशयित वाहने

अनिस हारून शहा यांच्या दुकानाच्या तपासणीत मारुती स्विफ्ट, लॉरा, इंडिका, टाटा मांझा तसेच नंबर नसलेली पांढऱ्या रंगाची चारचाकी वाहनाची बॉडी आढळून आली.

संजयनगरातील दुकानात १६ संशयित वाहने

संजयनगर येथील सुलेमान दादामिया शहा, शकिल इब्राहिम शहा आणि आसिफ हारून शहा यांच्या दुकानाची तपासणी केली असता विविध कंपन्यांची १६ संशयित वाहने आढळून आली. यामध्ये टाटा कार, मारुती अल्टो, टाटा मॅजिक, मारुती ओमिनी, स्विफ्ट, टाटा सुमो, टाटा इंडिका, पोलो, आय-२०, टाटा व्हिस्टा आणि टाटा एस आदी वाहनांचा समावेश आहे.

कागदपत्रे नाहीत ; मालकीहक्क सिद्ध करण्यात अपयश

पोलिसांनी ताब्यात मिळालेल्या वाहनांबाबत व वाहनांच्या पार्ट्सबाबत संबंधितांकडे कागदपत्रांची विचारणा केली. मात्र, समाधानकारक स्पष्टीकरण देण्यात आले नाही तसेच सदर वस्तूंचा मालकीहक्क सिद्ध करता आला नाही, असे पोलिसांनी प्रेस नोटमध्ये नमूद केले आहे.

या प्रकरणी आसिफ दाऊद तांबोळी, फिरोज रसुल शहा, अनिस हारून शहा, सुलेमान दादामिया शहा, शकिल इब्राहिम शहा आणि आसिफ हारून शहा यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम १२४ नुसार कारवाई करण्यात आली आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात ९६१/२०२६ ते ९६४/२०२६ असे चार स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वाहनांचा ‘स्रोत’ शोधण्याचे पोलिसांसमोर आव्हान

न्यायालयाच्या परवानगीने पुढील तपास करण्यात येणार असून, ही वाहने कोठून खरेदी करण्यात आली, कोणाकडून मिळाली, त्यांची मूळ कागदपत्रे कोणाकडे आहेत, याचा सखोल तपास केला जाणार आहे. त्यामुळे या कारवाईतून वाहन चोरीच्या साखळीचा पर्दाफाश होतो का, याकडे आता लक्ष लागले आहे.

ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचोरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शना खाली श्रीरामपूर शहर पोलिसांनी केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!