घारगाव पोलिसांचे ऑलआऊट ऑपरेशन ; समन्स, वॉरंट बजावणीसह अवैध दारूविरोधात कारवाई
संगमनेर प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलीस ठाणे हद्दीत ऑलआऊट ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत समन्स बजावणी, वाहतूक केसेस, जामीनपात्र व अजामीनपात्र वॉरंट बजावणी, फरार आरोपींचा शोध तसेच अवैध दारूविक्रीविरोधात कारवाई करण्यात आली.
या कारवाईमध्ये १५ समन्स बजावण्यात आले. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध २३ केसेस दाखल करून ११ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याशिवाय २३ जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले.

तीन अजामीनपात्र वॉरंटमध्ये आरोपी ताब्यात :
अजामीनपात्र वॉरंट असलेल्या अब्बास नामदेव फटांगरे (रा. पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर), सुनील लहाणू फटांगरे (रा. पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर) आणि सतीश सुभाष फटांगरे (रा. पोखरी बाळेश्वर, ता. संगमनेर) यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले.
फरार आरोपीला अटक :
फरार आरोपी ज्ञानेश्वर केरबा कुरकुटे (रा. कुरकुटवाडी, ता. संगमनेर) यास अटक करण्यात आली.
पाहिजे आरोपी नितीन नानासाहेब विधाते (रा. ताहराबाद, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याचा मृत्यू झाल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करून ते न्यायालयात सादर करण्यात आले.
तडीपार आरोपी गणेश बबन कुरकुटे (रा. कुरकुटवाडी) हा त्याच्या राहत्या घरी मिळून आल्याने त्याच्याविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियमातील कलम १४२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपीस कल्याण येथे सोडण्यात आले.

अवैध दारूविरोधात मोठी कारवाई :
घारगाव पोलीस ठाणे हद्दीत महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ६५(ई) अन्वये एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत आरोपींकडून देशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईतील आरोपींमध्ये बाळू रामभाऊ केदार (रा. वरकडीफाटा, ता. संगमनेर), जालिंदर ममताजी डोलनर (रा. मांडवे बु., ता. संगमनेर), सुनील रमाजी बावकर (रा. मांडवे बु., ता. संगमनेर), विलास रामसाहेब केकान (रा. हिवरगाव पठार, ता. संगमनेर), जीवन गोरेक्षनाथ खिलारी (रा. साकूर, ता. संगमनेर) आणि अविनाश रोहिदास शिंगाडे (रा. संभाजीनगर) यांचा समावेश आहे.
या कारवाईत संबंधित आरोपींकडून ७ हजार ४०० रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

सदरची संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब बोरसे, पोलीस उपनिरीक्षक प्रविण महाले, पोलीस कर्मचारी गणेश रघुनाथ गांगले, नारायण ढोकरे, राजेंद्र कोरडे, महादेव हांडे, प्रमोद गाडेकर, चांगदेव नेहे, रोहिदास आठरे, मेटे घारगाव पोलीस स्टेशन यांनी केली.
