पालकमंत्र्यांच्या तालुक्यात वाळू माफियांचा धुमाकूळ !
LCB चा दणका ; दोन डंपरसह ३० लाखांचा मुद्देमाल जप्त
मुख्य सूत्रधार कोण ? बड्या मालकांची नावे समोर !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
पालकमंत्र्यांच्या तालुक्यातच वाळू तस्करांनी उच्छाद मांडला असून, स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) कारवाईचा बडगा उगारत या अवैध धंद्याला मोठा झटका दिला आहे. राहाता तालुक्यातील पुणतांबा-शिर्डी रस्त्यावर नपावाडी चौफुल्याजवळ सापळा रचून एलसीबीच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारे दोन हायटेक डंपर जप्त केले. या धडक कारवाईत ३० लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल लोटके, निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, योगेश कर्डीले आणि दीपक जाधव यांच्या विशेष पथकाने ही थरारक कारवाई केली.
१२ ऑगस्ट रोजी गस्तीवर असलेल्या पथकाला गुप्त बातमीदाराकडून खबर मिळाली की, नपावाडी शिवारातून रात्रीच्या अंधारात पुणतांबा ते शिर्डी मार्गाने अवैध वाळूची मोठी खेप जाणार आहे. माहिती मिळताच पथकाने नपावाडी चौफुल्यावर रात्रीच सापळा रचला. संशयितरीत्या येणाऱ्या दोन पिवळ्या रंगाच्या डंपरला थांबवून पाहणी केली असता, त्यात कसलाही परवाना नसलेली अवैध वाळू आढळून आली.

ताब्यात घेतलेले आरोपी व जप्त मुद्देमाल:
* विशाल नितीन कोल्हे (वय २१, रा. गणेशवाडी, शिर्डी)
* दौलत एकनाथ सोनवणे (वय ४०, रा. केलवड, ता. राहाता)
जप्त केलेला मुद्देमाल (एकूण किंमत ३०,४०,००० रुपये):
* टाटा डंपर (MH-17-CV-7716): किंमत १५ लाख रुपये (वाळूसह)
* टाटा विना क्रमांकाचा डंपर: किंमत १५ लाख रुपये (वाळूसह)
* अवैध वाळू: ४० हजार रुपये

मुख्य सूत्रधार कोण ? बड्या मालकांची नावे समोर !
पोलीस चौकशीत ताब्यात घेतलेल्या चालकांनी धक्कादायक खुलासा केला आहे. शिर्डी येथील ‘कोते’ आणि नांदुर्खी येथील ‘चौधरी’ या वाहन मालकांच्या सांगण्यावरूनच ही वाळू तस्करी सुरू होती. त्यामुळे या सिंडिकेटमागे आणखी कोण बडे मासे आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गु.र.नं. ३२१/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
