वाळू तस्कर पकडला !

डंपरसह २५ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त ; एक आरोपी ताब्यात

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

विनापरवाना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याविरुद्ध अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. या कारवाईत डंपरसह एकूण २५ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस अंमलदार निळकंठ कारखेले, रणजीत जाधव, सतीश भवर व प्रकाश मांडगे यांचे पथक तयार केले.

९ ऑगस्ट २०२६ रोजी हे पथक कोपरगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू वाहतुकीबाबत माहिती घेत असताना, गुप्त बातमीदारामार्फत प्रज्वल भालेराव (वय २२, रा. खडकी, ता. कोपरगाव) हा सांगवी रोडकडून टाकळी फाट्याकडे विनापरवाना डंपरमधून वाळू वाहतूक करीत असल्याची माहिती मिळाली.

माहितीच्या आधारे पोलिसांनी टाकळी फाटा येथे सापळा रचला. यावेळी संशयित डंपर थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये वाळू आढळून आली. वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत चालकाकडे चौकशी केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी आरोपी प्रज्वल शरद भालेराव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा विनाक्रमांकाचा डंपर आणि ६० हजार रुपये किमतीची वाळू, असा एकूण २५ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४३५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाणे करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!