“निधीच्या वल्गना, पण प्रत्यक्ष काम शून्य” ; संपतराव डोंगरेंचा नवीन लोकप्रतिनिधींवर घणाघात
संगमनेर | प्रतिनिधी –
ज्येष्ठ नेते व शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे यांनी संगमनेरच्या नवीन लोकप्रतिनिधींवर जोरदार टीका केली. “मागील दीड वर्षांत जनतेने तुमचा खरा चेहरा ओळखला आहे. निधी आणल्याच्या मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत; मात्र प्रत्यक्षात विकासकामे दिसत नाहीत,” असाही आरोप त्यांनी केला आहे. यशोधन कार्यालयातून तसे प्रसिद्धीपत्रक देण्यात आले आहे.
याप्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या विचारातून संगमनेर तालुका घडला, तर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्यपूर्ण विकासकामांमुळे तालुक्याला राज्यात वेगळी ओळख मिळवून दिली. “संगमनेर म्हटले की बाळासाहेब थोरात यांचे नाव घेतले जाते. त्यामुळेच काही जणांकडून तालुक्याची बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे,” असा आरोप त्यांनी केला.

विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात त्यांनी ईव्हीएम, विविध सरकारी योजना आणि पैशाच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले. तसेच आजही जनतेच्या मनात बाळासाहेब थोरात यांचेच नेतृत्व असल्याचा दावा त्यांनी केला.
नवीन लोकप्रतिनिधींना विकासकामांचा अभ्यास नसून केवळ निधीच्या घोषणा आणि प्रसिद्धीवर भर दिला जात असल्याचा आरोप करत त्यांनी जलजीवन प्रादेशिक पाणीपुरवठा योजना रखडल्याचाही दावा केला. ग्रामपंचायतीच्या निधीतून झालेल्या कामांचे श्रेय घेतले जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
तालुक्यात गुंडगिरी, दडपशाही आणि टक्केवारीचे राजकारण वाढल्याचा आरोप करत जनतेत सरकार आणि नवीन लोकप्रतिनिधींविषयी नाराजी असल्याचे डोंगरे म्हणाले. आगामी काळ काँग्रेसचाच असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

“पाण्यासाठी थोरात यांचाच संघर्ष”
१९८९ मध्ये संगमनेर तालुक्याला हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी संघर्ष केला. निळवंडे धरण, उजवा-डावा कालवा आणि भोजापूर चारी यांसारखे प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झाले. या कामांमध्ये सध्याच्या विरोधकांचे कोणतेही योगदान नसल्याचा दावा करत, “आधी माहिती घ्या, काम पूर्ण करा आणि मग बोला,” असेही प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
