संगमनेर मार्गेच रेल्वे आणण्यासाठी शेवटपर्यंत लढणार : आमदार अमोल खताळ

मुख्यमंत्र्यांसमोर महत्त्वाची कागदपत्रे सादर; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे नागरिकांना आवाहन

संगमनेर | प्रतिनिधी

नाशिक–पुणे रेल्वेमार्ग हा संगमनेर मार्गेच व्हावा, हीच आमची ठाम भूमिका असून त्यासाठी आवश्यक तो संघर्ष आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरू असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी स्पष्ट केले. हा संघर्ष केवळ कॅमेऱ्यासमोर किंवा लोकांना दाखवण्यासाठी नसून निर्णय घेणाऱ्या यंत्रणेशी सातत्याने संवाद साधूनच पुढे नेला जात असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका दर्शविल्याने नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.

प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात खताळ यांनी सांगितले की, नाशिक–पुणे रेल्वेमार्गाबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रकल्पासाठी संगमनेर तालुक्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र, मध्यंतरी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी हा प्रकल्प रद्द झाल्याचे जाहीर केल्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेण्यात आली.

या बैठकीत आतापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत न पोहोचलेली काही महत्त्वाची कागदपत्रे सादर करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारची सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी राज्य सरकार ५० टक्के निधी देण्यास तयार होते; मात्र आता रेल्वेमार्गासाठी लागणारा शंभर टक्के खर्च उचलण्याची तयारी महाराष्ट्र शासनाने दर्शविल्याचा दावा खताळ यांनी केला.

रेल्वेमार्गाबाबत विविध प्रकारच्या अफवा आणि दिशाभूल करणाऱ्या चर्चा जाणीवपूर्वक पसरवल्या जात असल्याचा आरोप करत नागरिकांनी अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. सरकार या प्रश्नावर सकारात्मक असून प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीस यांची पुन्हा भेट घेतली. त्यावेळी जीएमआरटी (GMRT) संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचा दावा खताळ यांनी केला. या समितीचा अहवाल निश्चितच सकारात्मक येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) परिसरातील रेल्वे कार्यालयात स्वतः दोन ते तीन वेळा जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यावेळी मिळालेल्या कागदपत्रांनुसार, जीएमआरटी परिसर असला तरी त्यापासून सुमारे १२ ते १३ किलोमीटर अंतरावरून रेल्वेमार्ग नेण्यास जीएमआरटी प्रशासनाचा कोणताही विरोध नसल्याचे स्पष्ट करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

काही जणांकडून या प्रकल्पाचे राजकारण करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत, हा रेल्वेमार्ग सन २००० मध्येच पूर्ण व्हायला हवा होता, असे खताळ यांनी नमूद केले. रेल्वेला विलंब झाला असला तरी ती संगमनेर मार्गेच यावी यासाठी शेवटपर्यंत संघर्ष करण्याची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केली.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!