संगमनेरकरांचा हक्क हिरावून रेल्वे शिर्डीला पळवली – डॉ. जयश्री थोरात

७०० कोटींचे भूसंपादन ; तरीही रेल्वेमार्ग बदलला 

संगमनेर | प्रतिनिधी — 

“संगमनेरचा रेल्वेचा हक्क हिरावून तो शिर्डीकडे वळविण्यात आला आहे. ७०० कोटी रुपयांचे भूसंपादन पूर्ण झाल्यानंतरही जनतेशी विश्वासघात करण्यात आला. आता केवळ निवेदने देऊन हा प्रश्न सुटणार नाही. संगमनेरकरांनी रस्त्यावर उतरून आपल्या हक्कासाठी निर्णायक लढा उभारला पाहिजे,” असे स्पष्ट प्रतिपादन संगमनेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा डॉ. जयश्री थोरात यांनी केले.

नाशिक–पुणे रेल्वे प्रकल्पाबाबत माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महायुती सरकारवर थेट निशाणा साधला. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पुढाकारातून महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुणे–चाकण–नारायणगाव–आळेफाटा–संगमनेर–सिन्नर–नाशिक असा रेल्वेमार्ग निश्चित करण्यात आला होता. या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला होता आणि भूसंपादनाची प्रक्रियाही मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली होती.

शेतकऱ्यांना ७०० कोटी रुपयांहून अधिक नुकसानभरपाई देण्यात आली होती. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुपीक जमीन, वनक्षेत्र आणि शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हा मार्ग निश्चित करण्यात आला होता. मात्र, २०२४ नंतर महायुती सरकारने हा मार्ग बदलून संगमनेरच्या विकासावर घाला घातल्याचा आरोप डॉ. थोरात यांनी केला.

पालकमंत्र्यांकडून रेल्वेमार्गाबाबत सातत्याने परस्परविरोधी विधाने केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली. “कधी रेल्वे शिर्डीमार्गे जाणार असल्याचे सांगितले जाते, तर कधी देवठाणमार्गे मार्ग प्रस्तावित असल्याचे सांगितले जाते. पण मूळ मंजूर मार्गाचे काय झाले, याचे उत्तर सरकार देत नाही,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

संगमनेर हा शिक्षण, सहकार आणि व्यापार क्षेत्रातील राज्यातील महत्त्वाचा तालुका असून, २५ हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण व रोजगारासाठी पुण्यात आहेत. रेल्वे सुरू झाली असती तर पुणे–संगमनेरचा प्रवास अवघ्या दोन तासांत झाला असता. आजही नागरिकांना पाच ते सहा तासांचा प्रवास करावा लागतो, तर अनेक युवक जीव धोक्यात घालून दुचाकीवरून प्रवास करत आहेत. त्यातून होणारे अपघात ही सरकारच्या दुर्लक्षाचीच किंमत असल्याची टीका त्यांनी केली.

युवक काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला निवेदन देण्यात येणार असून, हक्काची रेल्वे मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. “संगमनेर हा संघर्षातून घडलेला तालुका आहे. आमच्या हक्कावर गदा आणणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. रेल्वेसाठी आता प्रत्येक संगमनेरकराने रस्त्यावर उतरले पाहिजे,” असे आवाहन डॉ. जयश्री थोरात यांनी केले.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!