कॅमेऱ्यासमोर एक, पडद्यामागे दुसरी भूमिका नको ; पुणे–नाशिक रेल्वेवरून आमदार अमोल खताळ यांचा विरोधकांना थेट इशारा !
रेल्वेवर राजकारण नको ; माजी खासदार शिवाजी आढळराव पाटलांच्या नेतृत्वात काम करण्याची तयारी
संगमनेर/प्रतिनिधी –
“पुणे–नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या मुद्द्यावर विरोधकांनी दुटप्पी भूमिका सोडून जनतेसमोर आपली खरी भूमिका मांडावी. कॅमेऱ्यासमोर एक बोलायचं आणि पडद्यामागे भलतीच भूमिका घेऊन जनतेची दिशाभूल करायची, हा धंदा आता बंद करा,” असा रोखठोक आणि आक्रमक इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिला आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान माध्यमांशी बोलताना खताळ यांनी विरोधकांच्या राजकारणावर कडक शब्दांत प्रहार केला.
…तर माझ्यावर आरोप करून काय साध्य करणार?
पुणे-नाशिक रेल्वे संगमनेरवरून पळवली गेल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. यावर आक्रमक पवित्रा घेत आमदार खताळ म्हणाले,
“मी आमदार झाल्यानंतर रेल्वे संगमनेरवरून पळवली, असा बालिश आरोप विरोधक करत आहेत. अशा बिनबुडाच्या आरोपांमुळे प्रकल्प रेंगाळेल, त्याला गती मिळणार नाही. हा प्रकल्प अहिल्यानगर, संगमनेर, सिन्नर आणि नाशिक परिसराच्या भविष्याशी जोडलेला आहे. त्यामुळे यावर घाणेरडं राजकारण करू नका.”

आढळराव पाटलांच्या नेतृत्वात लढण्याची तयारी !
या रेल्वे प्रकल्पासाठी माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी सुरुवातीपासूनच मोठा पाठपुरावा केला आहे. आमदार खताळ यांनी यावेळी मोठी घोषणा करत सांगितले की, “या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शिवाजी आढळराव पाटील यांनी पुढाकार घेऊन नेतृत्व करावे, त्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहून काम करण्यास आम्ही पूर्णपणे तयार आहोत.”
या प्रकल्पाबाबत राज्य सरकार अत्यंत सकारात्मक असून मुख्यमंत्र्यांसह सर्वच नेते कामाला लागले असल्याची माहिती त्यांनी दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेण्याची विनंती करण्यात आली असून, ते लवकरच दिल्लीत सविस्तर चर्चा करणार आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील या प्रकल्पासाठी वैयक्तिक पातळीवर सातत्याने प्रयत्नशील आहेत.

राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र या !
“पुणे–नाशिक रेल्वे हा केवळ एका पक्षाचा किंवा नेत्याचा विषय नसून सर्वसामान्य जनतेच्या आर्थिक प्रगतीचा कणा आहे. विनाकारण आरोप-प्रत्यारोप करून वेळ घालवण्यापेक्षा सर्व लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येऊन केंद्र सरकारकडे भक्कम पाठपुरावा करावा. सर्वपक्षीय एकजूट दाखवली, तरच पुणे–नाशिक रेल्वेचे स्वप्न लवकर साकार होईल, अन्यथा जनतेची दिशाभूल थांबवा,” अशा कडक शब्दांत आमदार खताळ यांनी सर्वांनाच सुनावले आहे.
