सोशल मीडियावर नौटंकी करणाऱ्यांनी फुकटचे श्रेय लाटू नये ; आमदार अमोल खताळांचा विरोधकांना थेट इशारा !
जे ४० वर्षांत जमले नाही, ते दीड वर्षात होणार ; संगमनेरला लवकरच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO)
संगमनेर / प्रतिनिधी –
संगमनेर आणि अकोले तालुक्यातील नागरिकांची परिवहन विभागाशी संबंधित कामांसाठी वर्षानुवर्षे होणारी ससेहोलपट आता कायमची थांबणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर येथे लवकरच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) सुरू होणार आहे. गेल्या ४० वर्षांत जे कोणालाच शक्य झाले नाही, ते अवघ्या दीड वर्षाच्या कार्यकाळात करून दाखवले आहे. मात्र, या कामाचे श्रेय लाटण्यासाठी काहीजण सरसावले असून, “काही लोक केवळ सोशल मीडियावर नौटंकी करण्यात आणि फुकटचे श्रेय घेण्यात माहीर आहेत,” अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली आहे.
मुंबई येथील मंत्रालयात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत नुकतीच एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. आमदार खताळ यांनी मांडलेली बाजू आणि संगमनेर-अकोले तालुक्यातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन परिवहनमंत्र्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून कार्यालय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे थेट आदेश दिले आहेत.
सध्या संगमनेर व अकोले तालुक्यातील वाहनधारकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, परमिट आणि हस्तांतरण यांसारख्या कामांसाठी अहिल्यानगर (अहमदनगर) किंवा इतर ठिकाणी हेलपाटे मारावे लागत होते. यामुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाया जात होते. आता हे कार्यालय संगमनेरमध्येच सुरू होणार असल्याने दोन्ही तालुक्यांतील लाखो नागरिकांना आणि वाहनधारकांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे.
