पत्नीची हत्या ; आरोपीस जन्मठेप !

अकोले पोलिसांच्या तपासानंतर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

संगमनेर प्रतिनिधी –

अकोले तालुक्यात पत्नीच्या खुनाप्रकरणी दाखल गुन्ह्यात आरोपी काशीनाथ रामनाथ गिऱ्हे यास जिल्हा न्यायालय, संगमनेर यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपीस ५० हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

या प्रकरणातील फिर्यादीने अकोले पोलीस ठाण्यात ६ ऑक्टोबर २०२२ रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, ५ ऑक्टोबर २०२२ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आरोपी काशीनाथ हा दारू पिऊन फिर्यादीच्या घरात आला. त्यावेळी झालेल्या वादातून त्याने लोखंडी हत्याराने पत्नीच्या डोक्यावर व तोंडावर जोरदार मारहाण केली. गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी अकोले येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. 

या घटनेनंतर अकोले पोलीस ठाण्यात गु.रं.नं. ४४९/२०२२, भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथुन बी. घुगे यांनी करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. 

संगमनेर येथील जिल्हा न्यायालयात या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद तसेच साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे ॲड. भानुदास कोल्हे यांनी काम पाहिले, तर पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलीस शिपाई र शितल तोरकडी, स्वाती नाईकवाडी यांनी सहकार्य केले. 

दिनांक ३१ ऑगस्ट २०२६ रोजी जिल्हा न्यायालय, संगमनेर यांनी हा निकाल दिला. 

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!