बनावट औषधे देऊन डाळिंब बागेची वाट लावणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करा – आमदार अमोल खताळ 

दूधवाहतूक वाहनाने रात्री पावणेबारा वाजता खताळ शेतकऱ्याच्या दारी

संगमनेर | प्रतिनिधी –

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी गावाच्या शिवारातील एका शेतकऱ्याने आपल्या फळ आलेल्या डाळिंब बागेवर औषधांची फवारणी केली. मात्र त्यानंतर सर्व झाडांवरील डाळिंब अक्षरश: जळून गेले. एवढेच नाही तर पाला सुद्धा नष्ट झाला. संकटात सापडलेल्या त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या बागेची प्रत्यक्ष पाहणी करत कृषी अधिकाऱ्यांना नुकसानभरपाईसह बोगस औषधे विकणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कडक कारवाईचे आदेश आमदार अमोल खताळ यांनी दिले असल्याची माहिती त्यांच्या प्रसिद्धी विभागाकडून देण्यात आली आहे.

संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील डाळिंब उत्पादक शेतकरी सोमनाथ किसन गोडसे यांनी आपल्या दोन एकर डाळिंब बागेवर स्थानिक कृषी सेवा केंद्रातून आणलेल्या रासायनिक औषधांची फवारणी केली होती. मात्र, या फवारणीनंतर संपूर्ण बाग जळून खाक झाली. वर्षभराच्या कष्टांवर पाणी फिरल्याने गोडसे यांचे सुमारे २५ ते ३० लाख रुपयांचे अतोनात आर्थिक नुकसान झाले.

आमदार अमोल खताळ हे पेमगिरी येथे एका कुटुंबाच्या सांत्वनभेटीसाठी आले होते. त्यावेळी शेतकरी सोमनाथ गोडसे यांनी त्यांची भेट घेऊन आपल्यावर ओढवलेल्या संकटाची माहिती दिली आणि बागेची पाहणी करण्याची विनंती केली.

तात्काळ आमदार खताळ यांनी रात्री पावणेबाराच्या सुमारास त्यांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, गोडसे यांच्या घराकडे जाणारा रस्ता पाऊस चिखल यामुळे खडतर असल्याने तिथे छोटी चारचाकी गाडी जाणे शक्य नव्हते. आमदार खताळ यांनी एका दूधवाहतूक वाहनातून जात बागेची पाहणी केली.

शेतकरी गोडसे यांच्याकडून संपूर्ण प्रकार समजून घेतल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी रात्रीच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. ज्या कृषी सेवा केंद्राने शेतकऱ्याला बनावट व बोगस औषधे दिली, त्याची खात्री करून त्या केंद्रावर तात्काळ कारवाई करण्याची सूचना केली. नियमानुसार पीडित शेतकऱ्याला जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्याचे आमदार खताळ यांनी कृषी विभागाला निर्देश दिले. 

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!