पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना
राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा
अहिल्यानगर | प्रतिनिधी
राज्य शासनाने जाहीर केलेल्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज थेट माफ करण्यात येणार असून, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. तसेच दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी ‘एकवेळ समझोता’ (One Time Settlement) योजनेचीही तरतूद करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या मते, महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना असून, पुनर्गठित आणि फेरपुनर्गठित कर्जांचाही या योजनेत समावेश करण्यात आला आहे. संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन, पारदर्शक आणि आधार प्रमाणीकरणावर आधारित असणार आहे.
अनियमित पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट, हवामान बदल आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असल्याने त्यांना नव्याने उभारी देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे. कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना सुधारित बियाणे, सूक्ष्म सिंचन, यांत्रिकीकरण, पीक विविधीकरण आणि मूल्यवर्धित शेतीसाठी नव्याने आर्थिक संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनाही या योजनेचा मोठ्या प्रमाणावर लाभ मिळणार आहे. ऊस, कांदा, द्राक्षे, डाळिंब, कापूस, ज्वारी, हरभरा, सोयाबीन, गहू आणि विविध फळपिकांवर आधारित जिल्ह्याच्या कृषी अर्थव्यवस्थेला या निर्णयामुळे चालना मिळणार आहे. कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांची पत पुन्हा निर्माण होऊन त्यांना नव्याने कर्ज घेणेही सुलभ होणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत विहिरी, तलाव, बंधारे आणि जलसंधारणाची अनेक लोककल्याणकारी कामे करून शेती आणि ग्रामीण विकासाला चालना दिली होती. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या नावाने जाहीर करण्यात आलेली ही कर्जमुक्ती योजना त्यांच्या कार्याला खरी आदरांजली मानली जात आहे. शेतकरी सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर झाला तरच ग्रामीण महाराष्ट्र अधिक बळकट होईल, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश असल्याचे शासनाने म्हटले आहे.

