लपून – छपून लावला बालविवाह ; पाच जणांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
संगमनेर | प्रतिनिधी
एकीकडे मुलींच्या शिक्षणाचा आणि स्वावलंबनाचा उदोउदो केला जात असताना, दुसरीकडे समाजमनाला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना संगमनेर तालुक्यातून समोर आली आहे. मुलगी अल्पवयीन आहे हे ठाऊक असूनही, तिचे भविष्य धुळीस मिळवत लपून-छपून बालविवाह उरकण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी ५ जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ मार्च २०२६ रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास साकुर येथील राजा बिरोबा मंगल कार्यालयात चिमुकलीचे आयुष्य अंधारात ढकलण्याचा डाव रचला गेला. मुलगी १८ वर्षांपेक्षा लहान आहे, याची पूर्ण जाणीव असतानाही तिचे लग्न लावून देण्यात आले. बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी सागर परसराम रसाळ (वय ३५) यांनी पोलिसांत फिर्याद नोंदवली आहे.
कायद्याची पायमल्ली करणाऱ्या आरोपींमध्ये वामन दगडू खेमनर, रत्ना वामन खेमनर, अरुण वामन खेमनर, गणेश मारुती बर्गे आणि मनीषा गणेश बर्गे यांचा समावेश आहे. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम, २००६ मधील कलम ९, १० आणि ११ अन्वये यांच्यावर घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
