शेळ्यांची चोरी करणारी टोळी पकडली !
संगमनेर तालुक्यातील गुन्हे उघड…
१२ गुन्ह्यांची उकल – १०.१३ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपी अटकेत
संगमनेर | प्रतिनिधी
अहिल्यानगर, श्रीगोंदा, संगमनेर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील विविध भागांत शेळ्या व बोकड चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत १० लाख १३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून १२ गुन्ह्यांची उकल झाली आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना ३१ जुलै रोजी गुप्त माहिती मिळाली की, शेळी चोरी करणारे आरोपी टाटा सुमो गोल्ड वाहनातून केडगाव बायपास येथे येणार आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून एमएच-१२-जेबी-०१७१ क्रमांकाची टाटा सुमो गोल्ड अडवून तपासणी केली. वाहनाच्या मागील बाजूस शेळ्या आढळून आल्याने चौघांना ताब्यात घेण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये ओमकार सुधाकर परंवार (रा. खडकी, पुणे), शहाबाज सिराज कुरेशी (रा. येरवडा, पुणे), सक्षम विवेक भोर (रा. पिंपरी, पुणे) व अरबाज रशीद कुरेशी (रा. येरवडा, पुणे) यांचा समावेश आहे.
आरोपींकडून दोन मोबाईल, तीन शेळ्या, एक बोकड व टाटा सुमो गोल्ड वाहन असा एकूण ९ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासात लोणी काळभोर येथील एका मटन विक्रेत्याकडून चोरीच्या शेळ्यांच्या विक्रीतून मिळालेली ५० हजार रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली. त्यामुळे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १० लाख १३ हजार रुपये झाली आहे.
चौकशीत आरोपींनी संगमनेर तालुक्यातील पळसखेडे गावासह अहिल्यानगर, श्रीगोंदा, घारगाव, नगर तालुका आणि पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरात शेळ्या व बोकड चोरी केल्याची कबुली दिली. चोरीतील जनावरे पुणे परिसरातील काही मटन विक्रेत्यांना विकल्याची माहितीही त्यांनी पोलिसांना दिली आहे. या प्रकरणातील चार मटन विक्रेते सध्या फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.

या कारवाईमुळे संगमनेर तालुका, नगर तालुका, घारगाव, श्रीगोंदा तसेच रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या एकूण १२ शेळीचोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे.
संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक ४०८/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत आरोपींना पुढील तपासासाठी संगमनेर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच त्यांच्या पथकाने केली.
