संगमनेरात गांजा विक्रेत्यांवर एलसीबीचा छापा !

तीघे जेरबंद ; २ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

संगमनेर | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या विशेष मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर शहरात मोठी कारवाई करत गांजा विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली. या कारवाईत २ लाख ३४ हजार २५० रुपयांचा गांजा, दुचाकी, मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले असून आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संगमनेर शहरात माहिती संकलन करत होते. यावेळी गुप्त बातमीदाराकडून जनता नगर परिसरातील एका घरातून गांजाच्या पुड्या तयार करून विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली.

ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने जनता नगर येथे छापा टाकला. कारवाईदरम्यान संजय उर्फ संदिप राजू मालुंजकर (वय २६), आकाश विजय क्षीरसागर (वय २९) आणि प्रविण सखाराम पाचकर (वय २८) या तिघांना ताब्यात घेण्यात आले.

आरोपींच्या घराची तसेच त्यांच्या ताब्यातील टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीची झडती घेतली असता ४.१३० किलो गांजा, टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी, मोबाईल फोन तसेच गांजाच्या पुड्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्या, चिकट टेप, स्टेपलर व पिना असा एकूण २,३४,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक ७३६/२०२६ अन्वये गुंगीकारक औषधिद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ (एनडीपीएस) कायदा, १९८५ अंतर्गत कलम ८(क) व २०(ब)(ii)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस करत आहेत.

अंमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी अशाच प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!