संगमनेर तालुक्यात चाकूच्या धाकाने जबरी चोरी ; एक लाखांचा ऐवज लंपास, महिलेवर हल्ला
संगमनेर, प्रतिनिधी :
संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काकडवाडी फाटा परिसरात २ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तुळसाबाई संपत शिरसाट (रा. काकडवाडी, ता. संगमनेर) या त्यांच्या बहिणी व मामीसोबत कार्यक्रमासाठी जाण्यासाठी वाहनाची वाट पाहत उभ्या असताना निळ्या रंगाच्या बोलेरो वाहनातून आलेल्या अनोळखी इसमांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबवले. चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील सुमारे एक लाख रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले.
या प्रकारात महिलेला धक्का लागून त्या जखमी झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपी दागिने घेऊन बोलेरो वाहनातून तळेगावच्या दिशेने पसार झाले.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६) अन्वये संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

