गंभीर गुन्हे करणारी टोळी एक वर्षासाठी हद्दपार
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –
अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी गंभीर स्वरूपाचे शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई सुरू ठेवली आहे. त्याअंतर्गत नगर शहरातील एका गुन्हेगार टोळीला एक वर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, अनुसूचित जाती-जमातीच्या व्यक्तीला जातीवाचक शिवीगाळ करून गंभीर दुखापत करणे, दरोडा, अल्पवयीन मुलीचा विनयभंग, हद्दपार आदेशाचा भंग, दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणारे कृत्य तसेच दडपशाहीने बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये संबंधित टोळीचा सहभाग आढळून आला होता.

या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर सखोल चौकशी करून टोळीप्रमुख सरवर अस्लम शेख उर्फ भिम्या (रा. झेंडीगेट, सुभेदार गल्ली, अहिल्यानगर) तसेच टोळी सदस्य रेहान रऊफ शेख (वय २८, रा. नालसाब चौक, सुभेदार गल्ली, झेंडीगेट) आणि मुजम्मील शहीद शेख (वय २६, रा. जिलानी बिल्डिंग, अहिल्यानगर) यांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी शरीराविरुद्धचे, मालमत्तेविरुद्धचे, गोवंशीय कायद्यांतर्गत, भारतीय हत्यार कायद्यान्वये तसेच अवैध वाळू उपसा करणाऱ्या टोळ्यांची माहिती संकलित करून त्यांच्याविरुद्ध हद्दपारीची कारवाई सुरू आहे. आणखी काही गुन्हेगार टोळ्यांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून त्यांच्याविरुद्धही लवकरच कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

