‘इव्हेंटबाजी’त धार्मिक निष्ठा हरवली ; सण-उत्सवांचा उपयोग केवळ राजकीय फायद्यासाठी !
विशेष प्रतिनिधी |
सण, उत्सव, यात्रा, जत्रा आणि महाप्रसाद, भंडारे हे आस्थेचे आणि श्रद्धेचे प्रतीक मानले जातात. मात्र, या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचा वापर आता केवळ राजकीय पक्षांचे ‘इव्हेंट’ साजरा करण्यासाठी केला जात असल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नेत्यांकडून धार्मिक व्यासपीठांचा सर्रास वापर केला जात असून, या तथाकथित ‘चमकोगिरी’मुळे खऱ्या भाविकांच्या भावना मात्र पायदळी तुडविल्या जात असल्याची चर्चा आहे.

‘वाढपी’ मोहिमेचा फार्स आणि ‘सोशल’ धुमाकूळ
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमीवर भगवान शिवाच्या प्रसिद्ध आणि पुरातन देवस्थानांवर भाविकांची गर्दी उसळणार आहे. दर श्रावणी सोमवारी भरणार्या यात्रा जत्रांमध्ये आपली राजकीय उपस्थिती दर्शवण्यासाठी नेतेमंडळी आणि त्यांचे कार्यकर्ते आत्तापासूनच सक्रिय झाले आहेत.
विशेषतः धार्मिक उत्सवांमधील अन्नछत्र, महाप्रसाद आणि भंडार्यांवर राजकीय नेत्यांनी एक प्रकारे ताबाच मिळवला आहे. महाप्रसादाच्या रांगेत उभ्या असलेल्या केवळ १० ते १२ भाविकांना वाढल्याचा आविर्भाव आणायचा, कॅमेऱ्यासमोर कॅज्युअल पोझ द्यायच्या आणि त्यानंतर तिथून लगेच गायब व्हायचे—हा नवा वाढपी पायंडा सध्या पाहायला मिळत आहे. त्यानंतर हेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर करून आपण किती ‘धर्मपरायण’ आणि ‘जनसेवक’ ‘समाजसेवक’ ‘लोकसेवक’ आहोत, याचा डंगोरा पिटला जातो. श्रावण महिन्यापासूनच सण उत्सवांना मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सवात तर प्रचंड धुमाकूळ घातला जातो.

देवाहून मोठे झाले नेत्यांचे चेहरे
उत्सव सुरू होण्यापूर्वीच शहरात आणि ग्रामीण भागात ठिकठिकाणी लागणारे भलेमोठे फ्लेक्स बोर्ड हा आणखी एक चर्चेचा विषय ठरत आहे. या फ्लेक्सवर देवाच्या मूर्तीपेक्षा किंवा मंदिराच्या छायाचित्रापेक्षा राजकीय नेत्यांचे आणि त्यांच्या समर्थकांचे फोटोच महाकाय असतात. या फोटोमध्ये श्रावणात “नेत्यांच्या गळ्यात फक्त नाग गुंडाळणेच बाकी राहिले आहे, बाकी त्यांनी स्वतःला महादेवापेक्षाही मोठे करून ठेवले आहे.” काही ठिकाणी मंदिराच्या मुर्त्याजवळ असे फोटो काढले जातात की, जेथे नागरिकांना प्रवेश नाही, तेथे हे नेते पोहोचतात आणि जवळजवळ मूर्तीच्या मांडीवरच बसायचे बाकी राहतात. सामान्य भक्तांना जवळही जाऊ दिले जात नाही. नेत्यांना मात्र सर्व नियम शिथील करून तेथे पोहोचवले जाते.

श्रद्धा की राजकीय स्वार्थ ?
या संपूर्ण प्रकारात धार्मिक सण-उत्सवांबद्दल नेत्यांना नेमकी किती आत्मीयता आहे आणि राजकीय स्वार्थ किती, हा आता मोठ्या संशोधनाचा विषय बनला आहे. सण-उत्सवांचे पावित्र्य जपणे बाजूला राहून, केवळ मतदारांमध्ये मिसळण्याचे आणि स्वतःची प्रसिद्धी करण्याचे ‘फंडे’ शोधण्यात नेते रंगले आहेत. नेत्यांच्या मागे फिरणारे त्यांचे लाभार्थी आणि कार्यकर्तेही या इव्हेंटबाजीत आघाडीवर दिसून येतात.
धर्माचा आणि आस्थेचा राजकीय फायद्यासाठी केला जाणारा हा अतिरेकी वापर सुजाण नागरिकांच्या डोळ्यात चांगलाच खुपू लागला आहे. मतांच्या राजकारणासाठी श्रद्धेचा बाजार मांडला जातो हेही तितकेच खरे.
