बौद्धिक दिवाळखोरीच्या पुरात बुडालेली ‘जेवणावळ’ !
एक होती आटपाट नगरी. नदीकाठची, कष्टकऱ्यांची, शेतकऱ्यांची, मजुरांची आणि हातावर पोट असलेल्या रयतेची नगरी. या नगरीने अनेक पूर पाहिले, अनेक दुष्काळ सोसले ; पण प्रत्येक संकटातून रयत स्वतःच्या जिद्दीने उभी राहिली.
मात्र काळ बदलला. समाजकारणाच्या जागी दिखाऊपणा आला, सेवाभावाच्या जागी प्रसिद्धीचा मोह आला आणि लोकहिताच्या जागी छायाचित्रांचा बाजार भरू लागला. भांडवलशाहीच्या बळावर सत्ता मिळवणाऱ्यांना जनतेच्या वेदनांपेक्षा त्यातून मिळणाऱ्या प्रसिद्धीची अधिक चिंता वाटू लागली.

आणि अशातच आटपाट नगरीत एक घोषणा झाली—”पूरग्रस्तांना जेवण देणार !”
घोषणा ऐकायला उदात्त. पण तिच्या मागचा विचार पाहिला तर अनेक प्रश्न उभे राहतात.
रयतेला जेवण देण्याची वेळ यावी, यासाठी आधी काय घडले पाहिजे ? नदीला पूर आला पाहिजे. घरे वाहून गेली पाहिजेत. संसार उद्ध्वस्त झाले पाहिजेत. लेकरांचे शिक्षण थांबले पाहिजे. शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टावर पाणी फिरले पाहिजे. सामान्य माणूस उघड्यावर आला पाहिजे. आणि मग त्याच्या हातात अन्नाचे ताट देऊन छायाचित्र काढले गेले पाहिजे !
हा सेवाभाव आहे की संकटाची वाट पाहणारी मानसिकता ?
खरी समाजसेवा पूर आल्यानंतर सुरू होत नाही ; ती पूर येऊ नये म्हणून केलेल्या प्रयत्नांत दिसते. नाल्यांची स्वच्छता, नदीपात्राचे संवर्धन, अतिक्रमणांवर कारवाई, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षित निवारा, आरोग्य सुविधा आणि वेळेवर मदत—ही खरी जनसेवा. संकट घडल्यावर कॅमेऱ्यासमोर ताट वाढणे हे समाजकारणाचे अंतिम मापदंड असू शकत नाही.
आज काही मंडळींना जनतेचे दुःख हे संवेदनेचे कारण नसून प्रसिद्धीचे साधन वाटू लागले आहे. पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये त्यांना स्वतःच्या प्रतिमेचे प्रतिबिंब दिसते. मदतीपेक्षा प्रसिद्धी महत्त्वाची वाटू लागली की सेवाभावाचा आत्माच मरतो.

रयतेला दान नको, सन्मान हवा आहे. तात्पुरते अन्न नव्हे, तर सुरक्षित जीवन हवे आहे. संकटानंतरचे फोटो नव्हे, तर संकट टाळणारे नियोजन हवे आहे.
समाजात संपत्ती असणे हा दोष नाही ; पण त्या संपत्तीबरोबर संवेदनशीलता नसणे ही नक्कीच बौद्धिक दिवाळखोरी आहे. संकटग्रस्तांच्या वेदनांना प्रचाराचे साधन बनवणारी मानसिकता समाजासाठी धोकादायक आहे. कारण ती माणसाला माणूस म्हणून नव्हे, तर प्रसिद्धी मिळवून देणारे माध्यम म्हणून पाहते.
आटपाट नगरीतील रयत आजही स्वाभिमानी आहे. तिचे घर उद्ध्वस्त व्हावे, संसार वाहून जावा आणि मग कुणाच्या दानधर्मावर जगावे, अशी तिची इच्छा नाही. तिला हवे आहे जबाबदार प्रशासन, दूरदृष्टीचे नियोजन आणि संकट टाळण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न.

शेवटी प्रश्न एका जेवणावळीचा नाही ; प्रश्न विचारांचा आहे. समाजकारण हे आपत्तीची वाट पाहणारे नसते, तर आपत्ती रोखण्यासाठी झटणारे असते. जनतेच्या दुःखावर प्रसिद्धीचे महाल उभारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी—रयत सर्व पाहत असते. ती उशिरा बोलते, पण जेव्हा बोलते तेव्हा इतिहास बदलून टाकते.
