नगरपालिका आणि पाटबंधारे विभागाचे ‘आपत्ती’तच ‘इष्टापत्ती’ शोधण्याचे धंदे !

शासकीय हलगर्जीपणामुळे संगमनेरकर पुन्हा एकदा महापुराच्या दाढेत 

संगमनेर विशेष प्रतिनिधी –

पावसाळा सुरू झाला की बैठकांचा फार्स, फोटोसेशनची नौटंकी आणि पूर आल्यावर मदतीचा आव आणणे… संगमनेर नगरपालिका आणि पाटबंधारे विभागाचा हा वार्षिक कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू झाला आहे. मात्र, प्रशासनाचा हा निर्लज्जपणा आणि सत्ताधाऱ्यांची निष्काळजीपणाची वृत्ती यामुळे यंदाही संगमनेरकरांच्या मानगुटीवर महापुराची टांगती तलवार कायम आहे. प्रवरा, म्हाळुंगी आणि आढळा या नद्यांच्या संरक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून पूर नियंत्रण रेषांचे सर्रास उल्लंघन झाले असून, नैसर्गिक आपत्ती येण्याआधीच मानवनिर्मित आपत्तीची पायाभरणी या जबाबदार यंत्रणांनी करून ठेवली आहे.

पूर नियंत्रण रेषेचा बट्ट्याबोळ ; पात्रातच इमारतींची अतिक्रमणे !

प्रवरा आणि म्हाळुंगी नद्यांच्या रौद्ररूपाचा आणि पुराच्या भीषणतेचा इतिहास संगमनेरकरांनी यापूर्वी अनेकदा अनुभवला आहे. असे असतानाही पूर नियंत्रण रेषा (Flood Lines) धाब्यावर बसवून नद्यांच्या पात्रात आणि गाळपेर क्षेत्रात टोलेजंग इमारती व हाउसिंग स्कीम्स उभ्या राहिल्या आहेत. म्हाळुंगी नदीच्या पात्रात तर थेट अतिक्रमणे झाली असून, शहरातील नाटके व मानोटी नद्यांचे अस्तित्वच संपवण्याचा घाट घातला गेला आहे. या बेकायदेशीर बांधकामांमध्ये सर्वच स्तरांतील मंडळींसह खुद्द पालिका प्रशासनाचे मूकसमर्थन आणि सहभाग असल्याचा घणाघाती आरोप नागरिकांमधून होत आहे.

आपत्ती व्यवस्थापन की ‘भोजन भाऊंची’ जत्रा ?

पुराचा धोका टळावा म्हणून कोणतीही ठोस उपाययोजना न करता, दरवर्षी आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली बैठकांचा बाजार भरवला जातो. नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांमध्ये केवळ ‘भोजन भाऊंची’ गर्दी जमली असून, आपत्तीच्या बैठकांमध्ये जेवणाची काळजी मात्र घेतली जात आहे. प्रसिद्धीच्या हव्यासाचा मार्ग जनतेच्या आपत्तीमधून जातो हेच खरे. नदी स्वच्छता मोहीम आणि पर्यावरणाच्या गप्पा मारणारे अधिकारी, लोकप्रतिनिधी, गाव पुढारी प्रत्यक्ष अतिक्रमणे हटवताना मात्र मान खाली घालून बसतात. पूर आल्यावर बाधित भागात जाऊन फोटो काढणे आणि ते सोशल मीडियावर फिरवून प्रसिद्धी मिळवणे, एवढाच एककलमी कार्यक्रम सध्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचा आणि विरोधकांचा देखील सुरू आहे.

निसर्गाचे तांडव घडल्यास जबाबदार कोण ?

निसर्गाच्या कोपापुढे कोणाचेही काही चालत नाही, हे माहीत असतानाही संभाव्य धोक्यांकडे डोळेझाक केली जात आहे. केवळ स्वतःच्या लाभासाठी सत्ताधाऱ्यांच्या समर्थकांनी नद्यांच्या पात्रांची वाट लावली आहे. उद्या जर मुसळधार पावसामुळे नद्यांना भीषण पूर आला आणि शहरातील मालमत्तेसह नागरिकांच्या जिवाचे बरे-वाईट झाले, तर या विनाशाला संगमनेर नगरपालिका, पाटबंधारे विभाग आणि जिल्हा प्रशासनच पूर्णपणे जबाबदार असेल.

शासनाने आणि वरिष्ठ प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन नद्यांच्या पात्रातील अतिक्रमणे तात्काळ हटवावीत आणि दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी अपेक्षा जनतेमधून दरवर्षी केली जाते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!