आटपाट नगरीतल्या शिक्षणसम्राट ब्रह्मराक्षसाचा ‘ज्ञान’ उद्योग !
एक होती आटपाट नगरी. त्या नगरीत कष्टकऱ्यांच्या घामावर शिक्षण संस्था उभ्या राहायच्या. शेतमजूर, कामगार, हातावर पोट असलेली माणसं दिवसरात्र राबायची आणि आपल्या लेकरांनी शिकून मोठं व्हावं, एवढंच स्वप्न पाहायची.
त्या स्वप्नाला आकार देण्यासाठी अनेक समाजधुरीणांनी, विचारवंतांनी आणि जनतेने रक्ताचे पाणी करून शिक्षणसंस्था उभ्या केल्या. त्या संस्था कोणाच्या बापाच्या नव्हत्या आणि कोणाच्या व्यक्तिगत मालकीच्याही नव्हत्या, त्या जनतेच्या विश्वासाच्या होत्या. पण काळ बदलला… आणि नगरीत अवतरला एक ‘शिक्षणसम्राट’.

हा सम्राट शिक्षणासाठी नव्हे, तर शिक्षणाच्या बाजारासाठी आला होता. त्याला ज्ञानाची नव्हे, तर पैशाची भूक होती. त्याने पाहिले की, सर्वाधिक नफा मिळणारा उद्योग म्हणजे शिक्षण ! मग सुरू झाला ‘ज्ञान’ नव्हे, तर ज्ञानाचा व्यापार. महागड्या शाळा, आलिशान कॉलेज, भरमसाठ फी, डोनेशन आणि शिक्षणाच्या नावाखाली लाखोंची दुकानदारी… गरीबांच्या मुलांसाठी दारं बंद, पण श्रीमंतांसाठी लाल गालिचे.
इतक्यावरही त्याची भूक भागली नाही.
ज्या शिक्षणसंस्था समाजाने उभ्या केल्या होत्या, त्यांच्यावर राजकारण, पैसा आणि प्रभावाच्या जोरावर ताबा मिळवण्याची मोहीम सुरू झाली. जनतेच्या संस्था हळूहळू एका व्यक्तीच्या साम्राज्यात रूपांतरित होऊ लागल्या. संस्थांची ओळख बदलली, नावं बदलली आणि इतिहासावरही नव्या मालकाची छाप उमटू लागली.
पैसा आला तशी स्तुती करणाऱ्यांची फौजही तयार झाली. प्रश्न विचारणारे कमी झाले आणि टाळ्या वाजवणारे वाढले. सत्य बोलणाऱ्यांना कोपऱ्यात उभं केलं जाऊ लागलं.

आणि मग सुरू झाला सगळ्यात मोठा विनोद…
ज्याने शिक्षणाचं व्यापारीकरण केलं, तोच शिक्षणावर व्याख्यानं देऊ लागला. ज्याच्या संस्थांवर भरमसाठ फी, डोनेशन आणि सर्वसामान्यांना परवडणार नाही अशा शिक्षणाचे आरोप होतात, तोच शिक्षण सुधारण्याचे धडे देऊ लागला. हा प्रकार म्हणजे “ताकाला जाऊन भांडे लपवण्यासारखा” नव्हे, तर त्याही पुढचा झाला.
एकीकडे शिक्षण महाग होत गेलं, दुसरीकडे गरीब विद्यार्थ्यांची स्वप्नं महागाईच्या ओझ्याखाली दबली. शिक्षण हा अधिकार आहे की व्यवसाय, असा प्रश्न सामान्य जनतेला पडू लागला. आता आटपाट नगरीत कुजबुज सुरू झाली आहे… ज्ञानाचा प्रसार होत आहे की ज्ञानाचा व्यापार ? शिक्षणसंस्था समाजासाठी चालतात की साम्राज्य उभं करण्यासाठी ? गरिबांच्या मुलांसाठी शिक्षणाचा हक्क जिवंत आहे की फक्त कायद्याच्या पुस्तकात ? हे प्रश्न विचारणं गुन्हा नाही ; लोकशाहीत तो प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे.
कारण शिक्षण हे बाजारातील उत्पादन नसून समाजाच्या भवितव्याचा पाया आहे. आणि त्या पायावर जर नफेखोरी, सत्तेचा माज आणि व्यक्तिपूजा उभी राहिली, तर सर्वात मोठं नुकसान कोणाचं होईल ?

उत्तर एकच—संपूर्ण पुढच्या पिढीचं.
म्हणूनच आटपाट नगरीतील जनतेने व्यक्ती नव्हे, तर व्यवस्था तपासली पाहिजे. शिक्षणावर प्रश्न विचारले पाहिजेत. पारदर्शकता, समान संधी आणि सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा हक्क यासाठी आवाज उठवला पाहिजे. कारण शिक्षणाची मंदिरे वाचली, तरच समाज वाचेल; अन्यथा उरतील फक्त महागडी दुकाने… आणि ज्ञानाच्या नावाखाली चालणारा उद्योग !
