आटपाट नगरी : दोन ‘दादा’ आणि ‘सवयीच्या’ मौनाचे जंतर – मंतर !
आटपाट नगरीच्या राजकीय प्रयोगशाळेत सध्या एक विलक्षण आणि भयंकर आजार पसरला आहे. “सोयीस्कर मौन सिंड्रोम!” या आजाराची सर्वात मोठी खासियत म्हणजे, एरवी व्यासपीठावर माईक हातात मिळताच डरकाळ्या फोडणारे, शब्दांचे बाण चालवणारे आणि जनतेचा कळवळा असल्याचा आव आणणारे ‘दादा’, जेव्हा खरोखर एखाद्या ज्वलंत प्रश्नावर भूमिका घ्यायची वेळ येते, तेव्हा अचानक राजकीय समाधीत लीन होतात.
राजधानीत युवाशक्ती रस्त्यावर उतरली. लाठ्या-काठ्यांचा मारा सहन करत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हक्क आणि भविष्यासाठी आवाज उठवला. देशभरातून या संघर्षाचे पडसाद उमटले. आटपाट नगरीतील रयत आणि तरुणही या संघर्षाशी एकरूप झाले. पण, सत्तेच्या गणितात गुंग असलेले नगरीतले दोन ‘महा-दादा’ मात्र अचानक शब्दहीन झाले !

गणिताच्या खेळात ‘निषेध’ आणि ‘समर्थन’ वजा !
स्थानिक दादा प्रत्येक गल्लीबोळातील विषयावर तावातावाने बोलण्याचा आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्याचा यांचा मोठा लौकिक. पूर्वेकडचे दादा राजकीय समीकरणांचे अजब गणितज्ञ ; सत्तेचे ठिगळ कुठे आणि कसे लावायचे याचे मास्टरमाइंड.
मात्र, युवाशक्तीच्या हक्काचा प्रश्न समोर येताच दोघांच्याही शब्दकोशातील “निषेध” आणि “समर्थन” हे दोन्ही शब्द गायब झाले. दोन्ही दादांनी तोंडावर राजकीय सुरक्षेचा असा ‘मास्क’ चढवला आहे की, तिथून रयतेचा आक्रोश आत जात नाही आणि मौनाचा मुखवटा बाहेर पडत नाही. “हे मौन विवेकाचे लक्षण आहे की केवळ स्वतःची कातडी वाचवण्याचा राजकीय सोयिस्करपणा ?”

भाषणात ‘सिंह’, संघर्षात ‘मौनव्रती’ !
आटपाट नगरीत हा जुनाच इतिहास आहे. निवडणुका जवळ आल्या की हेच तरुण “भविष्य घडवणारे शिल्पकार” ठरतात, राजकीय सभांचे फ्लेक्स लावायला आणि टाळ्या वाजवायला कामी येतात. पण जेव्हा हेच तरुण स्वतःच्या न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात, तेव्हा ते राजकीय कॅलेंडरवरून अचानक वजा केले जातात.
सकाळी टपरीवरच्या चहाच्या कपात एकमेकांविरुद्ध वादळाचे नाट्य उभं करायचं, आणि संध्याकाळी सत्तेच्या बंद दारांमागे गणिताच्या बैठका मारायच्या—या दोन दादांचे हे दुहेरी रूप आता नगरीतल्या लहान मुलालाही कळून चुकले आहे. “भाषणात डरकाळी फोडणारा टायगर, संघर्षाच्या वेळी मौनव्रती होतो—ही राजकारणातील नवी, लाचार प्रजाती आहे काय ?”
लोकशाहीत मतभेद असू शकतात, पक्षाची धोरणे वेगळी असू शकतात ; पण तरुणांच्या आणि रयतेच्या संघर्षावर मूग गिळून बसणे हे नैतिक दिवाळखोरीचे लक्षण आहे. भूमिका समर्थनाची असो वा विरोधाची, सत्तेवर बसलेल्या लोकप्रतिनिधीला भूमिका घ्यावीच लागते. कारण “गप्प राहणे” हीदेखील एक सोयीस्कर राजकीय चाल असते, आणि जनता या चालींची बारकाईने नोंद ठेवत असते. आटपाट नगरीच्या बाजारपेठेत आणि राजकीय वर्तुळात आता ढोंग उघडे पडले आहे.

“रयत रस्त्यावर उतरून रक्त आटवते, दादा बंद दारांमागे राजकीय गणिते मांडतात…पण विसरू नका, या सवयीच्या मौनाचे ओझं शेवटी मतपेटीतूनच बाहेर पडते !”
राजकीय भाषणांची गर्दी, प्रसिद्धीचा आव आणि सतत बदलणारी सत्तासमीकरणे यांच्या गोंधळात रयत एक गोष्ट कधीच विसरत नाही. संकटाच्या काळात कोण बोलत होतं, कोण गप्प बसलं आणि कोण स्वतःच्या स्वार्थासाठी पळ काढत होतं !
