मेडीकव्हर हॉस्पिटल प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन
संगमनेर टाइम्सच्या वृत्ताची दखल ; दोन दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
अहिल्यानगर | प्रतिनिधी
संगमनेर येथील मेडीकव्हर हॉस्पिटल संदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर यांनी याबाबत कार्यालयीन आदेश जारी केला आहे.
आदेशानुसार, संगमनेर टाइम्समध्ये दि. २१ जुलै २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या अनुषंगाने ही चौकशी करण्यात येणार आहे. संबंधित प्रकरणात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना (MJPJY) अंतर्गत उपचारासाठी रुग्णांकडून २० हजार रुपये अतिरिक्त रक्कम मागितली असा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या घटनेमुळे शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेच्या प्रतिमेला धक्का पोहोचू शकतो, असे नमूद करत जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
समितीमध्ये पुढील अधिकाऱ्यांचा समावेश
डॉ. राजकुमार जऱ्हाड – वैद्यकीय अधीक्षक (समिती अध्यक्ष)
डॉ. उमेश गोडे – तालुका आरोग्य अधिकारी, संगमनेर
डॉ. सपना परदेशी – वैद्यकीय अधिकारी (TPA/ABPMJAY-MJPJY)
डॉ. अतुल गुंजाळ – जिल्हा समन्वयक, MJPJY (सदस्य सचिव)
समितीने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोन दिवसांत आपला अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
