बदनामी… खंडणी… 

आमदार खताळांचा पोलिसांवर विश्वास नाही !

थेट मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार

विशेष प्रतिनिधी – 

संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि त्यातून व्यक्त केलेली खंत सध्या संपूर्ण चर्चेचा विषय बनली आहे. आपल्याच मतदारसंघातील खांडगाव येथील एका तरुणाकडून सोशल मीडियावरून आपली अतोनात बदनामी केली जात आहे, थेट श्रद्धांजली वाहणाऱ्या अक्षम्य पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत आणि या माध्यमातून आपल्याकडून खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा सनसनाटी अन् तितकाच गंभीर आरोप आमदारांनी केला आहे. या गलिच्छ कारस्थानामागे कोणता ‘आका’ दडला आहे, त्याला जनतेसमोर उघड करू असा आक्रमक इशारा खताळांनी दिला असला तरी, या संपूर्ण प्रकरणाने एका मोठ्या कायदेशीर आणि राजकीय प्रश्नाला जन्म दिला आहे.

थेट पोलिसांत फिर्याद का नाही ? आमदारांची ‘भाबडी आशा’ की भीती ?

जर स्वतः आमदार दर्जाच्या लोकप्रतिनिधीची उघडउघड बदनामी होते आणि त्यांच्याकडे खंडणी मागितली जाते, तर त्यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद (FIR) का दाखल केली नाही ? हा कळीचा प्रश्न आज जनतेच्या मनात उपस्थित होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन हे एक कर्तव्यकठोर, निष्पक्ष आणि संविधानाची बुज राखणारे अधिकारी असल्याचे सांगितले जाते. असे सक्षम पोलीस अधीक्षक असताना, संगमनेरच्या स्थानिक पोलीस ठाण्यात फिर्याद न नोंदवता थेट मुख्यमंत्र्यांकडे अन् गृहमंत्र्यांकडे धाव घेण्याचा पवित्रा खताळांनी का घेतला ?

गृहखात्याचा कारभार कसा चालतो आणि पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, यावर आज संपूर्ण महाराष्ट्रात आणि सोशल मीडियावर तीव्र टीका होत आहे. अशा स्थितीत “गृहमंत्र्यांकडे तक्रार करून न्याय मिळेल” ही आमदारांची भाबडी आशा केवळ केविलवाणी वाटते. स्वतः सत्ताधारी पक्षाचे आमदार असूनही जर त्यांना स्थानिक पोलिसांवर विश्वास नसेल आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांच्या आशेवर राहावे लागत असेल, तर संगमनेर पोलीस प्रशासनाचा कारभार किती कुचकामी आणि रसातळाला गेला आहे, हेच खुद्द आमदारांच्या या भूमिकेने उघड्यावर आणले आहे !

आयटी सेलचे विकृत राजकारण आणि ‘बुमरँग’चा दणका

आज सोशल मीडियातून कोणाकोणाची बदनामी होते, हा खरोखरच संशोधनाचा विषय बनला आहे. देशात गांधी घराण्यापासून सुरू झालेली ही गलिच्छ चिखलफेक पुढे मोदी-शहांपर्यंत पोहोचली आणि आता गल्लीबोळातील राजकारणापर्यंत पसरली आहे. खोट्या बातम्या पसरवणे, बनावट रील्स तयार करणे आणि जाहीर वक्तव्यांची तोडफोड करून जनतेत संभ्रम निर्माण करणे, हा धंदा बनला आहे. दुर्दैवाने, या उद्योगात सर्वच राजकीय पक्षांचे ‘आयटी सेल’ आणि त्यांचे गुप्त कारभारी आघाडीवर आहेत. त्यामुळे आता कोणीही साळसूदपणाचा आव आणण्याची अजिबात गरज नाही.

हा संपूर्ण प्रकार म्हणजे ‘पेरावे तसे उगवते’ आणि ‘बुमरँग’सारखा आहे ! जेव्हा गुप्त कारभाऱ्यांमार्फत किंवा आयटी सेलच्या माध्यमातून दुसऱ्याची चिखलफेक करता, तेव्हा त्याचे प्रत्युत्तरही तशाच जशास तशा तीव्रतेने मिळते ; मग ते दिल्लीचे राजकारण असो की संगमनेरसारख्या तालुक्याचे गाव असो !

गृहखात्याला जाब विचारण्याची वेळ !

हवेतील इशारे आणि पत्रकार परिषदांमधील आक्रोशाने गुन्हेगारी संपत नसते. संगमनेर पोलिसांचा कारभार व्यवस्थित नाही, हे या घटनेने सिद्ध केलेच आहे. आता मुख्य प्रश्न असा आहे की—आमदार अमोल खताळ प्रत्यक्ष पोलीस ठाण्याची पायरी चढून आरोपींवर व त्यांच्या मागे असलेल्या ‘आका’वर अधिकृत फिर्याद कधी दाखल करतात ? आणि मुख्यमंत्र्यांना भेटून अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रशासनाला सज्जड दम भरण्यास कधी भाग पाडतात ? जर लोकप्रतिनिधीच कायदेशीर कारवाईत कच खाणार असतील, तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा ? गृहखात्याला आणि या विकृत यंत्रणेला सजग राहून जाब विचारण्याची हीच खरी वेळ आहे !

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!