‘जयहिंद लोक चळवळ’सारख्या संस्था समाज आणि देश घडवतात’ — पणन मंत्री जयकुमार रावल

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

समाजहित, कृषी विकास आणि राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात स्वयंसेवी संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून ‘जयहिंद लोक चळवळ’ सारख्या संस्था गेली अनेक वर्षे लोककल्याणाचे उल्लेखनीय कार्य करत आहेत, असे प्रतिपादन राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केले.

जयहिंद लोक चळवळ आयोजित हरितक्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त ‘युवा शेतकरी सन्मान’ कार्यक्रमात ते बोलत होते. माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक डॉक्टर सुधीर तांबे, खासदार भास्कर भगरे, आमदार मनोज कायंदे, दुर्गाताई तांबे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रगतशील शेतकऱ्यांचा गौरव करण्यात आला.

रावल म्हणाले की, जयहिंद लोक चळवळ ही संस्था गेल्या २८ वर्षांपासून कृषी, पर्यावरण, ग्रामीण विकास आणि सामाजिक क्षेत्रात सातत्याने लोकहिताचे कार्य करत आहे. लोकहिताला केंद्रस्थानी ठेवून विकसित, सुदृढ, संवेदनशील आणि सक्षम भारत घडविण्याचे ध्येय घेऊन संस्था काम करत आहे. २०४७ पर्यंत विकसित भारताच्या संकल्पनेला बळकटी देण्यासाठी अशा कार्यकर्त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.

यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक आणि स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करत त्यांच्या कार्याचा गौरव केला. “समाजात एक दिवा पेटवणारा कार्यकर्ता अनेकांना प्रेरणा देतो आणि त्यातून परिवर्तनाची मोठी चळवळ उभी राहते,” असेही ते म्हणाले.

शेतीत प्रगती ; पण विक्रीचे मोठे आव्हान

शेतीमध्ये देशाने मोठी प्रगती केली असली तरी उत्पादन विक्रीचे संकट आजही कायम असल्याचे रावल यांनी स्पष्ट केले. “पीक घेण्याइतकेच ते योग्य भावात विकणे हे आज अधिक कठीण झाले आहे. केळी, द्राक्षांसह विविध पिकांच्या बाजारपेठेतील अडचणींबाबत शेतकऱ्यांचे फोन सतत येत असतात. त्यामुळे उत्पादनाबरोबरच प्रभावी विपणन व्यवस्था उभारणे ही काळाची गरज आहे,” असे त्यांनी सांगितले.

शेतकरी देशाचा अन्नदाता

“भारतीय शेतकरी नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटांशी झुंज देत देशाचे अन्नसुरक्षेचे काम करत आहे. स्वातंत्र्यानंतर देशात अन्नटंचाई होती; मात्र आज भारत जगातील अन्नधान्य उत्पादनात अग्रस्थानी असून जगाचे अन्नभांडार म्हणून ओळख निर्माण झाली आहे. याचे सर्वात मोठे श्रेय शेतकऱ्यांना जाते,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

महिला शेतकऱ्यांना ओळख देण्याचा निर्णय

यावर्षी महिला शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून महिला शेतकऱ्यांना अधिकृत ‘महिला शेतकरी प्रमाणपत्र’ देण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती रावल यांनी दिली. या प्रमाणपत्रामुळे विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

युवा शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतोय

आजचा युवा शेतकरी संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान, सेंद्रिय व नैसर्गिक शेती, प्रक्रिया उद्योग आणि थेट बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याच्या संकल्पनेवर काम करत आहे. कृषी क्षेत्रात नवकल्पना स्वीकारणाऱ्या अशा प्रगतशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आवश्यक असून त्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे रावल यांनी नमूद केले.

कृषीबरोबरच उद्योग, व्यापार, सेवा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांत समन्वयाने काम केल्यास विकसित भारताचे स्वप्न निश्चितच साकार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!