ॲसिड हल्ला पीडितेस शासन सर्वतोपरी मदत करणार — महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

पीडित मुलीशी व तिच्या कुटुंबीयांशी आदिती तटकरे यांनी साधला संवाद

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क 

संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथील ॲसिड हल्ल्यातील पीडित मुलीची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात जाऊन भेट घेतली. या अत्यंत निंदनीय घटनेतील पीडित मुलीच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे आणि तिच्या पुढील उपचारांचा संपूर्ण खर्च शासन करेल, अशी ग्वाही तटकरे यांनी दिली.

रुग्णालयात उपचार घेत असलेल्या या मुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र, तिचे वय लहान असून त्वचा संवेदनशील असल्याने तिला आणखी काही दिवस उपचारांची तसेच एका शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. डॉक्टर व प्रशासन तिची पूर्ण काळजी घेत आहेत. मुलीचे विशेष समुपदेशकाकडून समुपदेशन करण्यात आले असून, स्थानिक डॉक्टरांच्या मदतीने हे समुपदेशन पुढेही प्रभावीपणे सुरू ठेवण्याबाबत चर्चा झाली आहे.

पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, या उपचारांचा कोणताही आर्थिक भार पीडितेच्या कुटुंबावर पडू दिला जाणार नाही. पीडितेस महिला व बालविकास विभागाच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत एक लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य तात्काळ देण्यात येईल. यासोबतच, न्याय विभागाच्या ‘व्हिक्टिम कॉम्पेन्सेशन स्कीम २०२२’ अंतर्गत तिच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून ३ लाख रुपये आधीच देण्यात आले आहेत.

घटनेच्या दिवसापासूनच आपण पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात असल्याचे सांगून मंत्री तटकरे म्हणाल्या, स्थानिक आमदारांनीही हा मुद्दा सभागृहात मांडला होता. सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून, विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. कुटुंबाकडे काही अतिरिक्त माहिती असल्यास ती पोलिसांना द्यावी, तसेच त्यांच्या काही अपेक्षा असल्यास त्या सांगाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.

या सांत्वनपर भेटीदरम्यान पीडित मुलीच्या कुटुंबातील तिची आई, मावशी व मामा उपस्थित होते. तसेच, आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि जिल्हा महिला व बालविकास अधिकारी संजय कदम हेही याप्रसंगी उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!