अहिल्यानगर पोलिसांची गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम ; रेकॉर्डवरील २२० आरोपींचे समुपदेशन

अहिल्यानगर | प्रतिनिधी

अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम राबविली आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार दक्षिण विभागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गंभीर गुन्ह्यांमध्ये नोंद असलेल्या २२० रेकॉर्डवरील आरोपींचे पोलीस मुख्यालय, अहिल्यानगर येथे विशेष समुपदेशन करण्यात आले.

या वेळी आरोपींचे इंट्रॉगेशन फॉर्म भरून घेण्यात आले तसेच प्रतिबंधात्मक कारवाईसंदर्भातील बंधपत्रांची माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सर्व आरोपींना कायद्याच्या चौकटीत राहून वर्तन करण्याचा सल्ला देत गुन्हेगारीचा मार्ग सोडून समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याचे आवाहन केले.

भाईगिरी, गँगवार, खंडणी, मारामारी, दहशत निर्माण करणे, शस्त्रांचा बेकायदेशीर वापर किंवा कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा त्यांनी दिला. अशा घटना घडल्यास संबंधितांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई, तडीपारची प्रक्रिया तसेच इतर कठोर कायदेशीर उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

गेल्या काही दिवसांपासून अहिल्यानगर जिल्हा पोलीस अवैध धंदे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे, फरार आरोपी आणि सराईत गुन्हेगारांविरोधात सातत्याने विशेष कारवाई करत आहेत. त्याच मोहिमेचा भाग म्हणून हे समुपदेशन आयोजित करण्यात आले. या उपक्रमामुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असून, जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी भविष्यातही अशा कठोर आणि प्रतिबंधात्मक कारवाया सुरू राहणार असल्याचा स्पष्ट संदेश पोलीस प्रशासनाने दिला आहे.

या विशेष मोहिमेस अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, दक्षिण विभागातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच संबंधित पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!