टक्केवारीच्या राजकारणामुळेच निकृष्ट कामांना खतपाणी मिळत आहे ; कोल्हार घोटी राज्यमार्ग निकृष्ट कामाची चौकशी करा
धांदरफळ परिसरातील कार्यकर्त्यांचे निवेदन – रास्ता रोको चा इशारा
संगमनेर | प्रतिनिधी
अकोले आणि संगमनेर तालुक्यांना जोडणाऱ्या कोल्हार-घोटी राज्यमार्गाच्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात धांदरफळ परिसरातील नागरिक व कार्यकर्ते आक्रमक झाले असून, संबंधित कामाची उच्चस्तरीय चौकशी करून तातडीने दुरुस्ती करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते दत्ता कोकणे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी नवनाथ देशमाने, सागर वाघचौरे, बाळासाहेब कानवडे, जावेद तांबोळी, आशिष गोसावी, शुभम हासे यांच्यासह परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील डांबरीकरणाचा वरचा थर अत्यंत पातळ असून अनेक ठिकाणी रस्ता उखडून खड्डे पडले आहेत. रस्त्यावर सातत्याने धूळ उडत असल्याने प्रवासी, वाहनचालक, विद्यार्थी, महिला व नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करूनही निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची शासकीय स्तरावर सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
यावेळी दत्ता कोकणे यांनी संगमनेर तालुक्यातील विकासकामांमध्ये “टक्केवारीच्या राजकारणामुळेच निकृष्ट कामांना खतपाणी मिळत आहे,” असा गंभीर आरोप करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास मंगळवार, १४ जुलै २०२६ रोजी सकाळी ९ वाजता सातवा मैल येथे नागरिकांच्या उपस्थितीत भव्य ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, रस्त्याची तातडीने दुरुस्ती आणि निकृष्ट कामाची चौकशी सुरू न झाल्यास यापुढे अधिक तीव्र जनआंदोलन छेडले जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
