दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा : डॉ. सुधीर तांबे

‘वृक्ष संगोपन हीच खरी मानवतेची व ईश्वराची सेवा’

संगमनेर | प्रतिनिधी

ग्लोबल वॉर्मिंग, घटता पाऊस, वाढती उष्णता आणि दुष्काळ यांसारख्या पर्यावरणीय समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. यावर्षी दंडकारण्य अभियानांतर्गत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करावे. वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन हीच खरी मानवतेची व ईश्वराची सेवा असल्याचे प्रतिपादन दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी आयोजित दंडकारण्य अभियानाच्या नियोजन बैठकीत ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे व्हाइस चेअरमन पांडुरंग पाटील घुले, प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे, सभापती शंकरराव खेमनर, सरपंच सोमनाथ गोडसे, गोरख नवले, गोरख सोनवणे, सुभाष सानप, योगेश पवार, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, आदिवासी सेवक बाबा खरात, समन्वयक प्राचार्य दशरथ वर्पे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. तांबे म्हणाले की, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेले दंडकारण्य अभियान पर्यावरण संवर्धनाची मोठी लोकचळवळ ठरली आहे. या अभियानातून सप्तशृंगी गड परिसरात १०० हेक्टर क्षेत्रावर वृक्षारोपण करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात वृक्ष आजही जिवंत आहेत. तालुक्यातील विविध डोंगरांवरही सहकारी संस्थांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वृक्षसंवर्धन करण्यात आले आहे.

यावर्षी ‘एक विद्यार्थी – दोन झाडे’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार असून प्रत्येक नागरिकाने वनविभागाच्या मोकळ्या जागा, गावातील सार्वजनिक जागा तसेच स्वतःच्या शेतबांधावर अधिकाधिक वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

प्रकल्प प्रमुख दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, तालुक्यातील सहकारी संस्थांच्या सहकार्याने वृक्षारोपण व संवर्धनाचे उल्लेखनीय काम झाले आहे. मात्र अनेक ठिकाणी लावण्यात येणारे वनवे ही चिंतेची बाब आहे. यंदाच्या तीव्र उन्हाळ्यात अनेक झाडे करपली, तरीही सातत्याने पाणी देऊन ती जिवंत ठेवण्यात आली. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या परिसरातील उपलब्ध मोकळ्या जागेत वृक्षारोपण करावे.

सरपंच गोरख नवले यांनी सांगितले की, वनविभाग किंवा गावातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण केल्यास महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत महिला व युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. बिहार पॅटर्नच्या धर्तीवर हा उपक्रम राबविल्यास गावांना आर्थिक उत्पन्नासोबत पर्यावरण संवर्धनाचाही मोठा लाभ होईल. कारखान्याचे व्हाइस चेअरमन पांडुरंग पाटील घुले यांनी वृक्षसंवर्धन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असून लावलेले प्रत्येक झाड जगविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य दशरथ वर्पे यांनी केले, तर आभार पांडुरंग पाटील घुले यांनी मानले.

वनश्री पुरस्काराने मालदाड गावाचा गौरव

मालदाड ग्रामस्थ व ग्रामपंचायतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करून आदर्श निर्माण केला आहे. या उपक्रमातून गावात सुमारे ६० लाख रुपयांचा रोजगार निर्माण झाला असून १४ एकर क्षेत्रावर शेवगा, आंबा आदी फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. या उपक्रमामुळे गावाला भविष्यात उत्पन्नाचेही मोठे साधन उपलब्ध झाले आहे. या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मालदाड गावाला ‘वनश्री पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. यावेळी सरपंच गोरख नवले यांचा डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!