साहित्य पुरवण्या व्यावसायिक झाल्या याची खंत : रवींद्र शोभणे —
संदीप वाकचौरे यांच्या तीन पुस्तकांचे प्रकाशन
संगमनेर | संगमनेर टाइम्स —
मराठी भाषेतील साहित्य अधिक समृद्ध होत आहे. लिहिणारे हात आणि त्याच प्रमाणात वाचक वाढत आहेत.खरतर वर्तमानपत्र साहित्याचा प्रवास घडवत असतात.त्यातून उत्तम साहित्य पोहोचत असते. मात्र अलीकडच्या कालखंडात वृत्तपत्राच्या साहित्य पुरवण्या व्यावसायिक झाल्या असून पुरवण्या व्यावसायिक स्वरूप येते आहे हे कटू वास्तव आहे. ग्रामीण भागातील लेखक रसभरीत लेखन करत आहेत. ग्रामीण असले तरी अस्सल साहित्य उपलब्ध होते आहे ही नक्कीच अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक रवींद्र शोभणे यांनी केले. ते प्रकाशन कट्ट्यावर पुस्तके प्रकाशित करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती अमेरिकेचे सिनेट सदस्य श्रीनिवास ठाणेदार, ज्येष्ठ नाट्य लेखक श्री अभिराम भटकमकर, हेरंब कुलकर्णी, प्रकाशन कट्ट्याचे समन्वयक घनश्याम पाटील, आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

प्राध्यापक शोभणे आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, पुस्तक प्रकाशनाला संमेलनात स्वतंत्र व्यासपीठ मिळवून दिले जात आहे. चपराकचे घनश्याम पाटील एकांडा शिलेदार आहेत, कोणतेही पाठबळ नसताना त्यांनी प्रकाशन संस्था उभी केली आणि ग्रामीण भागातील लेखकांना ते उत्तम संधी देत आहे. ही बाब अभिनंदनीय आहे संदीप वाकचौरे यांचे पत्रास कारण की आणि उजेडाच्या वाटा या दोन शिक्षणाचे पसायदान या पुस्तकांचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
सातारा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात आज तिसऱ्या दिवशी दोन सत्रात एकूण पुस्तकांचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणाले की, प्रकाशन विश्वाला पाटील यांनी कमी वेळात अधिक पुस्तकं प्रकाशित करुन जणू एक चपराक दिली आहे. ग्रामीण भागातील लेखकांना चपराकने लिहीतं केलं ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे .
यावेळी बोलताना अमेरिकेचे एकमेव मराठी खासदार ठाणेदार म्हणाले की, साहित्य संमेलनातील प्रकाशनची जागा पाहून मी भारावून गेलो आहे .साहित्य संमेलनात लेखकांकडून शुल्क न घेता पुस्तकाचे प्रकाशन ही बाब नक्कीच अभिनंदनीय आहे. हे माझं तिसरं पुस्तकं आहे , मी ४७ वर्षे अमेरिकेत वास्तव्याला आहे , आधी आमदार होतो आता खासदार झालो आहे. अमेरिकेतील ४३५ मधील मी एकमेव मराठी खासदार आहे. घटनाबाह्य निर्णय घेणाऱ्या राष्ट्राध्यक्षा विरुद्ध मी तेथील संसदेत आवाज उठवला. २०१० मध्ये अमेरिकेत आलेल्या मंदित मी पूर्ण धुळीस मिळालो आणि आता परत उभा राहिलो आहे. आता अमेरिकेत विविध घटकांच्या विकासासाठी प्रयत्न करतोय असे खा. ठाणेदार श्रीनिवास यांनी नमूद केलं.

यावेळी बोलताना अभिराम भडकमकर म्हणाले की, लेखकाने कितीही पुस्तकं लिहिली तरी, नवं पुस्तक त्याला नवा आनंद देत असतं. आता तर एवढी नवी पुस्तकं येत आहेत, मग लोक वाचत नाहीतं असं म्हणणं आता थांबवायला हवं. खरंतर न वाचणारे लोकच अशा प्रकारची अफवा पसरवत असतात असेही भडकमकर यांनी नमूद केले.
लेखकांच्या वतीने संदीप वाकचौरे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, घनश्याम पाटील यांच्यासारखा एक प्रकाशक, एक लेखक, एक संपादक केवळ शिक्षण या एकाच विषयावर २० पुस्तकं प्रकाशित करणे हे अपवादात्मक उदाहरण आहे. शिक्षणासारखा विषय वाचकांच्या समोर समग्रपणे आणण्याच्या यशामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षणातील विविध कंगोरे आणि आयाम याची मांडणी या पुस्तकांमध्ये करण्यात आलेले आहे.कवी श्रीकांत तारे म्हणाले की, वाचक लेखनाची दखल घेत आहेत, मग प्रकाशक घेत नाहीत ही खंत चपराकच्या घनश्याम पाटील यांनी भरुन काढली. समीक्षक रविप्रकाश कुलकर्णी म्हणाले की, नवोदिताचे दुःख आणि सुख याची कल्पना प्रकाशकाला असायला हवी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अंजली जोशी यांनी केले.

तिसरे पुस्तक ब्रेल लिपीतील..
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर संदीप वाकचौरे यांचे शिक्षणाचे पसायदान हे ब्रेल लिपीतील पुस्तक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वासराव पाटील, स्वागत अध्यक्ष महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, संस्कृती प्रकाशाच्या सुनिता राजे पवार, घनश्याम पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. ज्ञानेश्वरीतील शिक्षणाचा विचार अशा स्वरूपाची मांडणी असणार हे पुस्तक आहे नियमित पुस्तकाच्या तीन आवृत्त्या संपल्या आहेत. या निमित्ताने अंधवाचकांपर्यंत हा साहित्याचा प्रवास पोहोचणार असल्याचे समाधान असल्याचे प्रकाशक यांनी सांगितले.
