शनी शिंगणापूर येथे भाविकांची पिळवणूक करणाऱ्या एजंटांवर (लटकू) प्रतिबंधात्मक कारवाई

उपविभागीय दंडाधिकारी यांचे आदेश

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अहिल्यानगर –

शनिशिंगणापूर (ता. नेवासा) येथे देशभरातून येणाऱ्या भाविकांची एजंटांकडून (लटकू) होणारी आर्थिक पिळवणूक, फसवणूक व असुविधा रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगरचे उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १५२ (१) (a) अन्वये शिंगणापूर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

शनिशिंगणापूर हे ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्र असून येथे दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र, शनिशिंगणापूर पोलीस ठाणे आणि नेवासा तहसीलदार यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, मंदिर परिसर तसेच गावाच्या बाहेरील रस्त्यांवर काही खासगी व्यक्ती (एजंट/लटकू) भाविकांची वाहने अडवून त्यांना विशिष्ट दुकानांतूनच चढ्या दराने पूजा साहित्य खरेदी करण्यास भाग पाडतात. भाविकांनी यास विरोध केल्यास त्यांना दमदाटी व शिवीगाळ केली जाते. सन २०२५ मध्ये अशा प्रकारच्या ५३ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. या प्रकारांमुळे भाविकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.

जारी करण्यात आलेले प्रमुख आदेश:

१. वाहने अडविण्यास मनाई: शिंगणापूर गावाच्या बाहेरील किंवा गावातील सार्वजनिक रस्ते, चौक, बसथांबे, प्रवेश मार्ग किंवा इतर कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अथवा त्यांच्या वाहनांना थांबविणे, अडविणे किंवा त्यांना विशिष्ट ठिकाणी जाण्यासाठी सक्ती करणे, यास तात्काळ प्रतिबंध करण्यात आला आहे.

२. खरेदीची सक्ती नको: भाविकांना कोणत्याही विशिष्ट दुकानातून किंवा आस्थापनेतूनच खरेदी करणे, निवास करणे किंवा कोणताही व्यवहार करण्याचे सुचवू नये. याबाबत भाविकांना निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य राहील.

३. तोतयागिरीस प्रतिबंध : कोणत्याही खासगी व्यक्तीने स्वतःला देवस्थान ट्रस्ट किंवा प्रशासनाचा अधिकृत प्रतिनिधी असल्याचे भासवू नये.

४. मध्यस्थीस मनाई : भोजन, निवास किंवा दर्शनाच्या नावाखाली कोणत्याही व्यक्तीने मध्यस्थीचे व्यवहार करू नयेत.

सदर आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम २२३ अन्वये कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, या आदेशाने प्रभावित झालेल्या कोणत्याही व्यक्तीला दिनांक २८/०१/२०२६ पर्यंत उपविभागीय दंडाधिकारी, अहिल्यानगर यांच्या कार्यालयात उपस्थित राहून आपली बाजू किंवा हरकत नोंदवता येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना या आदेशाची कठोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!