“स्वीपनगरी” म्हणजे मतदार जनजागृतीचा ऐतिहासिक वारसा – मनपा आयुक्त यशवंत डांगे

नवीन मनपा कार्यालयात मतदार सहायता ‘स्वीप कक्ष’ पाहण्यासाठी नागरिकांना आवाहन

 संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क ​अहिल्यानगर –

“राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून मतदान आणि निवडणूक प्रक्रिया निरंतर सुरू असतात. लोकशाहीचे महत्त्व वारंवार अधोरेखित करण्यासाठी ‘स्वीप’सारखा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. अहिल्यानगर मनपा स्वीप समितीचा ‘स्वीपनगरी’ हा कक्ष मतदार जनजागृतीच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरू शकतो,” असे प्रतिपादन निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी केले.

​मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत उभारण्यात आलेल्या या कक्षाची पाहणी करताना श्री. डांगे यांनी मतदार जनजागृतीपर खेळांचा आनंद घेतला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते.

​अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे यांच्या संकल्पनेतून मनपाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ स्वीप समितीच्या वतीने मतदार जनजागृतीच्या शेकडो संकल्पना असलेला सुमारे ४ हजार स्क्वेअर फुटांचा ‘स्वीप कक्ष’ उभारण्यात आला आहे.

​या कक्षामध्ये भारत निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग (महाराष्ट्र) यांचे विविध जनजागृतीपर पोस्टर्स, मतदान प्रक्रिया साध्या व सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे मुलांसाठीचे मनोरंजक खेळ, ‘माझी सही-माझी मनपा’ हा १०० टक्के मतदानाच्या संकल्पाचा उपक्रम, बाराखडीतून लोकशाही शिक्षण, ‘माझी मनपा सेल्फी’ पॉईंट्स, क्यूआर कोड वॉल, व्हीआर (VR) बॉक्स, ईव्हीएम मशीनविषयक साक्षरता, ‘नोटा’ पद्धतीची माहिती, भारतातील पहिला ‘स्वीप केअर’ व्हॉट्सॲप क्रमांक, निर्भय मतदानासाठी आयोजित चित्रकला स्पर्धेतील पोस्टर्स, विविध निवडणूक ॲप्सची माहिती, चिकाटी व गुणवत्तेचे प्रतीक असलेली ‘एकी’ मुंगी, मतदानाच्या पायऱ्या दर्शवणारा ‘स्टापू’ खेळ, नैतिक मतदानाचा सापशिडी खेळ, विविध अर्जांची माहिती देणारा ‘भुलभुलैया’, मतदान वर्णमालेचा तंबोला आणि चालत सहज मतदान पद्धती दर्शवणारे खेळ असे विविध महत्त्वपूर्ण उपक्रम या कक्षात मांडण्यात आले आहेत.

​विविध शासकीय कामानिमित्ताने शहरभरातील व बाहेरील नागरिक नूतन मनपा कार्यालयास भेट देत असतात. शहराचे मुख्यालय असलेल्या या इमारतीत हा कक्ष उभारण्यामागे नागरिकांचे प्रबोधन व्हावे, असा स्वीप समितीचा मानस आहे. दि. २६ जानेवारी २०२६ पर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हा कक्ष सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला राहणार आहे.

“शिक्षक व पालकांनी आपल्या मुलांसह या कक्षाला जरूर भेट द्यावी, खेळ खेळावेत आणि लोकशाही प्रक्रियेची माहिती घ्यावी,” असे आवाहन स्वीप नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, सहाय्यक आयुक्त सपना वसावा, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन, मतदारदूत डॉ. अमोल बागुल, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे आणि प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी केले आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!