मनपा स्वीप समितीच्या वतीने “लोकशाहीचे फोटो” फोटोग्राफी स्पर्धा
लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर छायाचित्रे पाठवण्यासाठी आवाहन
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अहिल्यानगर —
महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ मध्ये मतदारांमध्ये जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी, याकरिता छायाचित्रकारांसाठी “लोकशाहीचे फोटो” या फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
”मतदानाची दृष्टी – फुलवी लोकशाहीची सृष्टी” हे या स्पर्धेचे घोषवाक्य आहे. ही स्पर्धा १) व्यावसायिक, २) प्रेस फोटोग्राफर, ३) हौशी, ४) शालेय गट (पाचवी ते बारावी-मोबाईल फोटोग्राफी) आणि ५) खुला गट (मोबाईल फोटोग्राफी) अशा पाच गटांत होणार आहे. स्पर्धेसाठी लोकशाही, मतदान, निवडणूक प्रक्रिया, मतदार जनजागृती आणि बोटावरील लोकशाहीची शाई हे पाच विषय निश्चित करण्यात आले आहेत.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांनी आपले फोटो इमेज/पीडीएफ/डॉक्युमेंट अशा कुठल्याही स्वरूपात स्वतःचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता व गट नमूद करून पाठवायचे आहेत. तसेच ‘हा फोटो मी स्वतः काढलेला आहे’ अशा आशयाचे प्रतिज्ञापत्रही जोडणे आवश्यक आहे. हे साहित्य देशातील पहिल्या ‘अहिल्यानगर मनपा स्वीप केअर’ या ८०५५८०९३९४ (8055809394) व्हाट्सअप क्रमांकावर १७ जानेवारी २०२६ पर्यंत पाठवायचे आहे. एका स्पर्धकास एकापेक्षा अधिक छायाचित्रे पाठवता येतील. स्पर्धेबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. सहभागी सर्व स्पर्धकांना सहभागाचे प्रमाणपत्रे वितरित केली जाणार आहेत. स्पर्धेमध्ये आदर्श आचारसंहितेच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

जिल्ह्यातील अधिकाधिक स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, स्वीप नोडल अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अशोक साबळे, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, मतदारदूत डॉ. अमोल बागुल, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे आणि प्रशासनाधिकारी जुबेर पठाण यांनी केले आहे.
