विसापूर कारागृहातील ‘बंदी’ आता होणार ‘मेकॅनिक’

​ संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अहिल्यानगर 

शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर सन्मानाने जगता यावे, यासाठी विसापूर खुल्या कारागृहातील बंद्यांच्या हाताला आता कौशल्याचे बळ मिळणार आहे. कारागृहातील बंद्यांसाठी दुचाकी व तीन चाकी वाहनांच्या दुरुस्तीचे (मेकॅनिक) प्रशिक्षण सुरू करण्यात आले असून, हे पाऊल त्यांच्या पुनर्वसनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

​जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जन शिक्षण संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने विसापूर जिल्हा खुले कारागृह (ता. श्रीगोंदा) येथे या उपक्रमाची सुरुवात झाली. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन सहाय्यक आयुक्त रविकुमार पंतम, जन शिक्षण संस्थानचे संचालक बाळासाहेब पवार व कारागृह अधीक्षक विजय सोळंके यांच्या उपस्थितीत झाले.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. याविषयी माहिती देताना श्री.पंतम म्हणाले , केवळ शिक्षा भोगणे हा उद्देश नसून भविष्यात त्यांना स्वतःच्या पायावर उभे करणे हे यामागील उद्दिष्ट आहे. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर बंद्यांना बाहेरच्या जगात वाहन दुरुस्तीचा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येईल. यासाठी लागणारे आर्थिक पाठबळ विविध शासकीय महामंडळांच्या माध्यमातून मिळवून देण्यासाठी मार्गदर्शनही केले जाईल.

श्री.पवार म्हणाले, प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या बंद्यांना शासनाचे अधिकृत प्रमाणपत्र मिळणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना ‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा’सारख्या योजनांतून खादी ग्रामोद्योग आणि जिल्हा उद्योग केंद्रामार्फत कर्ज उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे भविष्यात त्यांना कुणाकडे नोकरी मागण्याची गरज पडणार नाही.

​’कारागृहाची सुधारणा व पुनर्वसन’ या ब्रीदवाक्याला अनुसरून हा उपक्रम बंद्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवेल, असा विश्वास श्री.सोळंके यांनी व्यक्त केला.

​या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रांती सोनमाळी यांनी केले तर शफाकत सय्यद यांनी आभार मानले. यावेळी कारागृह प्रशासनाचे अधिकारी, वैद्यकीय अधिकारी व प्रशिक्षणार्थी बंदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

*******

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!