वाळू तस्करांच्या टोळीवर संगमनेर पोलिसांचा मोठा छापा !….
७ जणांवर गुन्हा दाखल ; जेसीबी, टिप्पर जप्त
संगमनेर | प्रतिनिधी –
संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावच्या शिवारात प्रवरा नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू उपसा करणाऱ्या टोळीवर तालुका पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी ६० लाख १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून एकूण सात जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांना ताब्यात घेतले आहे.

या संदर्भात संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, पिंपरणे गावच्या शिवारात नदीपात्राच्या दक्षिण बाजूला असलेल्या पुलाजवळ ताहीर शेख हा त्याच्या साथीदारांच्या मदतीने जेसीबी आणि ट्रॅक्टरचा वापर करून चोरून वाळू वाहतूक करत आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी मंगळवारी (१३ जानेवारी २०२६) पहाटे १२:४५ च्या सुमारास सापळा रचून छापा टाकला. यावेळी नदीकाठी वाहने लावून वाळू उपसा सुरू असल्याचे पोलिसांना दिसून आले.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून सात जणांना ताब्यात घेतले असून त्यांची नावे सुरज संजय पवार (वय २२, रा. घुलेवाडी, यशोदिप थिएटर जवळ), विशाल राजू रणशूर (वय २०, रा. घुलेवाडी), ऋषीकांत कारभारी वर्षे (वय २८, रा. कनोली), संतोष पंढरीनाथ भवर (वय ४०, रा. जोर्वे), शशिकांत शिवाजी नागरे (वय २५, रा. मालुंजे), ताहीर सुलतान शेख (वय २८, रा. डिग्रस) आणि अविनाश अनिल मिसाळ (वय २४, रा. घुलेवाडी) अशी आहेत. या सर्वांनी संगनमत करून पर्यावरणाचा ऱ्हास करत गौण खनिजाची चोरी केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

६० लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त –
पोलिसांनी या कारवाईत जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये १० लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा पिवळ्या रंगाचा टिप्पर (क्र. MH-17-CV-4063), ४० लाख रुपये किमतीचे पिवळ्या रंगाचे जेसीबी मशीन (क्र. MH-15-JM-4010), १० लाख रुपये किमतीचा महिंद्रा कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर ज्याचा नंबर खोडलेला होता, ५ हजार रुपये किमतीची लोखंडी फरांडी (केणी) व साखळी आणि टिप्परच्या हौद्यात असलेली १२ हजार रुपये किमतीची २ ब्रास वाळू असा एकूण ६० लाख १७ हजार रुपयांच्या मालाचा समावेश आहे.

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू सोनवणे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३(२) आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम ३ व १५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सचिन कचरू उगले करत आहेत.
