संगमनेर मध्ये अवैध देशी – विदेशी दारु पकडली !
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
देशी विदेशी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाला सापळा रचून पकडण्यात आल्यानंतर त्या वाहनातून अवैधरित्या देशी-विदेशी दारू आढळून आली. पोलिसांनी 2 लाख 19 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही कारवाई अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

गणेश बारुक धामणे (वय 40 वर्षे, रा. इंदिरानगर, गल्ली नं. 01, संगमनेर, ता. संगमनेर) उमेश सुर्यवंशी पुर्ण नांव माहित नाही. (रा. अकोले नाका, संगमनेर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि/महादेव गुट्टे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, योगेश कर्डीले, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे या पथकास पहाटेच्या वेळी संगमनेर शहर परिसरामध्ये अवैध धंद्याची माहिती काढत असतांना संगमनेर येथुन देवगड कडे एका चारचाकी वाहनामध्ये देशी दारुची वाहतुक होणार असल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने प्रवरा नदीच्या पात्रावरील पुलाजवळ सापळा रचुन कार नंबर एम.एच. 12 सी. डी. 5701 सह ताब्यात घेवुन कारची पाहणी केली असता सदर कारच्या डिकीमध्ये देशी दारुचे बॉक्स आढळुन आले. सदर बॉक्स बाबत ताब्यातील इसमाकडे अधिक विचारपुस केली असता त्याने सदरची देशी दारु ही उमेश सूर्यवंशी याचेकडुन आणलेली असल्याची माहिती दिली.

आरोपीकडुन 19,520/- रुपये किमतीची देशी दारु तसेच 2,00,000/- रुपये किमतीची एक हुंदाई कंपनीची ऍ़सेंट कार क्रमांक एम.एच. 12 सी. डी. 5701 असा एकुण 2,19,520/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन पोकॉ/176 बाळासाहेब अशोक गुंजाळ नेम – स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचे फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द संगमनेर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. 36/2025 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(अ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास संगमनेर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
