आता… घरबसल्या मतदान केंद्राचा आभासी अनुभव

अहिल्यानगर मनपा स्वीप समितीच्या अभिनव उपक्रमाचे राज्य निवडणूक आयोगाकडून विशेष कौतुक

​ संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अहिल्यानगर —

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने मतदार साक्षरता व जनजागृतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येत आहे. मतदानाला जाण्यापूर्वीच मतदान केंद्राची अंतर्गत रचना, मतदान प्रक्रियेचा क्रम, अधिकारी कक्ष, मतदान कक्ष व निर्गमन मार्ग यांची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी, यासाठी व्हर्च्युअल रियालिटी (VR) बॉक्सच्या माध्यमातून घरबसल्या मतदान केंद्राचा आभासी अनुभव अहिल्यानगर मनपा स्वीप समितीच्या अभिनव उपक्रमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे.

​अहिल्यानगर मनपा स्वीप समितीने मतदान प्रक्रियेत आभासी वास्तव तंत्रज्ञानाचा अवलंब करत एक मिनिटाचा थ्री-डी व्हिडिओ तयार केला असून तो जिल्हा मतदारदूत डॉ. अमोल बागुल यांनी विकसित केला आहे. हा व्हिडिओ मोबाईलमध्ये प्ले करून व्ही-आर बॉक्स/गिअरच्या सहाय्याने मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश, मतदान अधिकारी क्रमांक १, २, ३ यांची कार्यपद्धती, मतदान कक्ष (व्होटिंग कंपार्टमेंट) तसेच निर्गमनद्वार या सर्व टप्प्यांची क्रमवार व स्पष्ट माहिती मिळते. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांना जणू प्रत्यक्ष मतदान केंद्रात उभे आहोत असा अनुभव देणारा हा उपक्रम ठरत आहे.

​या अभिनव उपक्रमाचे प्रात्यक्षिक मुख्य निवडणूक निरीक्षक आदित्य जीवने व पथकातील अतिरिक्त जिल्हाधिकारी (जळगाव) श्रीमंत हरकर यांना निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांनी सादर केले.

जीवने म्हणाले, “नवी पिढी टेक्नो-सॅव्ही होत असताना मनपाने उचललेले हे मतदार साक्षरतेचे पाऊल प्रेरणादायी असून एका मतदाराला चार मतदान करावयाचे असल्याने हा उपक्रम मतदान प्रक्रिया सुलभ करून सहभाग वाढविण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल.”

​निवडणूक अधिकारी तथा मनपा आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे म्हणाले, “सर्वसामान्य मतदारांना मतदान प्रक्रिया अधिक सुलभ, सोपी व समजण्यासारखी व्हावी, तसेच प्रथमच मतदान करणारे युवक-युवती, ज्येष्ठ नागरिक व मतदान प्रक्रियेची माहिती नसलेले मतदार यांच्यासाठी माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मतदार साक्षरता वाढविण्याचा हा उपक्रम राबविण्यात येत आहे.”

​स्वीप नोडल अधिकारी अशोक साबळे यांनी माहिती देताना सांगितले, “मनपाच्या ‘स्वीपनगरी’ मतदार सहाय्यता कक्षात तसेच विविध शाळा व सार्वजनिक ठिकाणी हे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे”

अतिरिक्त आयुक्त विजयकुमार मुंढे, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, प्रसिद्धी अधिकारी नितीन ब्राह्मणे, प्रशासन अधिकारी जुबेर पठाण आणि स्वीप समिती सदस्यांनी या विशेष उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी केली आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!