‘अहिल्यानगर’ नावाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आमदार खताळ यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र 

शासन निर्णयाच्या काटेकोर पालनाचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित करावेत

संगमनेर | प्रतिनिधी —

संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील काही शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये, तसेच कार्यालयीन फलक, पत्रव्यवहार, शिक्के, नोंदी इत्यादी ठिकाणी आजही ‘अहमदनगर’ हे जुने नाव वापरात असल्याचे निदर्शनास येत आहे. ही बाब अधिकृत अधिसूचना व शासन निर्णयाच्या अनुषंगाने योग्य नाही. त्यामुळे सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये ‘अहिल्यानगर’ या नावाचा वापर करण्याबाबत आदेश निर्गमित करावे, अशा आशयाचे पत्र आमदार अमोल खताळ यांनी अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी यांना पाठवले आहे.

आमदार खताळ यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, अहमदनगर जिल्ह्याचे नाव ‘अहिल्यानगर’ असे करण्यास महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाने दिनांक १३ मार्च २०२४ रोजी मान्यता दिलेली आहे. त्यानंतर भारत सरकारने सदर नामांतरास मंजुरी देऊन दिनांक ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केलेली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे राजपत्र दिनांक ०८ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रसिद्ध झाले असून, त्यानुसार ‘अहिल्यानगर’ हे नाव अधिकृतपणे अंमलात आलेले आहे.

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या गौरवार्थ हे नामांतर करण्यात आले असून, याबाबत मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी दिनांक ३१ मे २०२३ रोजी घोषणा केलेली होती. त्यानंतर अधिकृत अधिसूचना व शासन निर्णय प्रसिद्ध झाले असतानाही संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी याचे पालन होताना दिसत नसल्याचे आमदार खताळ यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरून जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था व संबंधित सर्व यंत्रणांना स्पष्ट निर्देश देण्यात यावेत की, यापुढे सर्व कार्यालयीन कामकाज, फलक, पत्रव्यवहार, नोंदी व शासकीय कागदपत्रांमध्ये केवळ ‘अहिल्यानगर’ या अधिकृत नावाचाच वापर करण्यात यावा. याबाबत तातडीने आवश्यक आदेश निर्गमित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. अशी विनंती आमदार खताळ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!