‘सोलर पी. व्ही. इन्स्टॉलेशन हेल्पर’ या नावीन्यपूर्ण कौशल्य प्रशिक्षणाचा बंद्यांनी लाभ घ्यावा –जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क अहिल्यानगर —
जिल्हा कारागृहातील बंद्यांच्या पुनर्वसन व स्वावलंबनाच्या दृष्टीने कौशल्यावर आधारित ‘सोलर पी. व्ही. इन्स्टॉलेशन हेल्पर’ हा नावीन्यपूर्ण प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात आला असून, या प्रशिक्षणाचा अधिकाधिक बंद्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी केले.

जिल्हा कारागृहात जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जन शिक्षण संस्थान, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कौशल्य प्रशिक्षण अभ्यासक्रमाची तुकडी सुरू करण्यात आली, त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रविकुमार पंतम, जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संतोष कवार, दुर्गा एंटरप्राईजेसचे प्रसाद तोडमल आदी मान्यवर उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया म्हणाले , जिल्ह्यात सौरऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध आहेत. प्रशिक्षणादरम्यान विविध वित्तीय विकास महामंडळांमार्फत व्यवसायासाठी आर्थिक साहाय्य कसे प्राप्त करता येईल, याबाबत मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येईल. तसेच सौरघर योजना, कुसुम योजना यांसारख्या शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बंद्यांनी हे प्रशिक्षण पूर्ण करावे. कौशल्य प्रशिक्षणामध्ये मुलाखत तंत्र व सॉफ्ट स्किल्स यांचा समावेश करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जिल्हा कारागृहाचे अधीक्षक संतोष कवार म्हणाले , कारागृहातील बंद्यांच्या सुधारणा व पुनर्वसनासाठी विविध उपक्रम राबविले जातात. कौशल्य प्रशिक्षण हा त्याचाच एक महत्त्वाचा भाग असून, या प्रशिक्षणामुळे बंद्यांना रोजगारक्षम कौशल्य प्राप्त होऊन आगामी काळात त्यांच्या पुनर्वसनास मदत होईल.
सहायक आयुक्त रविकुमार पंतम म्हणाले, सौरऊर्जा ही भविष्यातील गरज असून या क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांना शासनामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार असून, त्या आधारे विविध वित्तीय संस्थांकडून व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक साहाय्य मिळविता येईल.

दुर्गा एंटरप्राईजेसचे प्रसाद तोडमल यांनी सौरऊर्जा ही कधीही न संपणारी ऊर्जा असून, या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार व उद्योजकतेच्या संधी असल्याचे नमूद केले. तसेच त्यांच्या संस्थेमार्फत प्रशिक्षणास आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या शेवटी जन शिक्षण संस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने बंदी उपस्थित होते.
