शेतातील महिलांचे मंगळसूत्र हिसकावणारी टोळी जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; ३ आरोपी ताब्यात, ४ जबरी चोरीचे गुन्हे उघड

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

शेतात काम करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने हिसकावून पळ काढणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी फरार आहेत. या टोळीने नगर व कर्जत तालुक्यात केलेले चार जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

२९ जुलै रोजी खडकी येथील केशर नामदेव कोठुळे यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने अकोळनेर-खडकी रस्त्यावरून जात असताना अज्ञात चोरट्यांनी हिसकावून नेले होते. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू केला. ३ ऑगस्ट रोजी मिळालेल्या माहितीवरून मेहेरबाबा समाधी परिसरात सापळा रचून आरोपींना अडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी दोन आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले, तर एक आरोपी मोटारसायकलवरून पळून गेला.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे नितीन जपकर चव्हाण (वय ४५) व रोहित नितीन चव्हाण (वय २०) अशी असून ते दोघेही भुषणनगर, केडगाव येथील रहिवासी आहेत. सुमित नितीन चव्हाण व रूक्षा गहिणीनाथ भोसले हे दोघे फरार आहेत.

आरोपींकडून दोन मोटारसायकली, मोबाईल फोन आणि चाकूसह १ लाख ३० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपींनी नगर तालुका व मिरजगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील आणखी चार जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान चोरीचे सोन्याचे दागिने केडगाव येथील सोनारांना विकल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी ३ लाख १ हजार रुपयांच्या सोन्याच्या लगडांसह मुद्देमाल जप्त केला. तसेच विपुल अशोक टगारे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन मोबाईलही जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे तसेच त्यांच्या पथकाने केली असून पुढील तपास नगर तालुका पोलीस ठाणे करीत आहे.

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!