पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन नगर जिल्ह्यात रुजू झाल्यापासून एलसीबीच्या कारवायांचा धडाका !
441 प्रकरणे ; 786 आरोपींवर कारवाई, 7 कोटी 84 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क —
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन हे अहिल्या नगर जिल्ह्यात रुजू झाल्यापासून त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) गेल्या तीन महिन्यांत गुन्हेगारीविरोधात मोठी मोहीम राबवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 1 मे ते 31 जुलै 2026 या कालावधीत 441 गुन्हे उघड व कारवाया करण्यात आल्या असून 786 आरोपींवर कारवाई करण्यात आली. तसेच 7 कोटी 84 लाख 12 हजार 715 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे अशी माहिती गुन्हे शाखेकडून प्रेस नोट द्वारे देण्यात आली आहे.
एलसीबीने खून, दरोडे, जबरी चोरी, घरफोडी, चोरी, अवैध वाळू उपसा, आर्म ॲक्ट, एनडीपीएस, गुटखा, गोमांस, जुगार, अवैध दारू यांसारख्या गंभीर गुन्ह्यांवर प्रभावी कारवाई केली. याशिवाय सराईत गुन्हेगारांविरुद्ध हद्दपार, एमपीडीए आणि मकोका अंतर्गतही कठोर पावले उचलण्यात आली.

ठळक कारवाया
2 खून प्रकरणे उघड ; 5 आरोपी अटक.
5 दरोडा व 5 दरोडा तयारी प्रकरणांचा छडा.
20 जबरी चोरी व 20 घरफोडी गुन्हे उघड.
30 अवैध वाळू कारवायांत तब्बल 3.69 कोटींचा मुद्देमाल जप्त.
11 गुटखा, 11 गोमांस, 153 दारुबंदी आणि 77 जुगार कारवाया.
5 आर्म ॲक्ट आणि 49 एनडीपीएस संबंधित कारवाया.

प्रतिबंधात्मक कारवाई
एलसीबीने गुन्हेगारांवरही मोठा वचक निर्माण केला असून 6 टोळ्यांतील 15 जणांना हद्दपार, 9 जणांवर स्वतंत्र हद्दपार कारवाई, 3 जणांवर एमपीडीए तर 4 प्रस्तावांतील 25 आरोपींवर मकोका लागू करण्यास मंजुरी मिळाली आहे.
जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि गुन्हेगारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या कठोर कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.
