अकोलेत दारू अड्ड्यांवर छापे !  10 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 

४ आरोपींवर गुन्हे दाखल ; एलसीबीची कारवाई 

संगमनेर टाइम्स न्यूज नेटवर्क –

अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने अकोले तालुक्यात मोठी कारवाई करत सुमारे १० लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत चार जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने ४ ऑगस्ट रोजी अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारवाई केली. गोपनीय माहितीच्या आधारे ब्राम्हणवाडा–बोटा रस्त्यावरील स्वामी समर्थ ॲक्वा शेजारील पत्र्याच्या शेडवर छापा टाकण्यात आला.

या कारवाईत अनिष बाबू पटेल (५८), नदीम याकुब पटेल (३१) आणि नाजीम अनिष पटेल (३१), सर्व रा. ब्राम्हणवाडा यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून देशी-विदेशी दारूच्या बाटल्या, दोन मोबाईल, रोख रक्कम, टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी आणि हुंडाई कार असा १०,५१,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिघांविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५०८/२०२६ अंतर्गत महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच मोहिमेदरम्यान ब्राम्हणवाडा येथील हॉटेल सम्यक येथे अवैधरित्या देशी दारूची विक्री करणारा उत्तम आनंद शिंदे (३४) यालाही ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १,७९० रुपयांचा देशी दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, गुन्हा क्रमांक ५०७/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांचा पुढील तपास अकोले पोलीस ठाण्याकडून सुरू असून, ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!