राजापूर उपकेंद्रात वीज वितरणात अडथळा ; प्रमोद शिवराम हासे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर | प्रतिनिधी

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात राजापूर उपकेंद्रातील वीज वितरण व्यवस्थेत अडथळा निर्माण करणे, सरकारी कामात हस्तक्षेप करणे आणि वीज यंत्रणेशी अनधिकृत छेडछाड केल्याप्रकरणी प्रमोद शिवराम हासे (रा. राजापूर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दुर्गेश अनिल जगताप (वय 34, रा. संगमनेर) यांनी फिर्याद दिली असून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय विद्युत अधिनियम, 2003 मधील कलम 138 व 146 तसेच भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 मधील कलम 221, 351(2) आणि 324(5) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा 5 ऑगस्ट 2026 रोजी रात्री 11.43 वाजता संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. 

फिर्यादी दुर्गेश जगताप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते महावितरणच्या राजापूर उपकेंद्रात यंत्रचालक म्हणून कार्यरत आहेत. 4 ऑगस्ट 2026 रोजी रात्री सुमारे 8.15 वाजता ड्युटीवर असताना आरोपी प्रमोद हासे याने त्यांच्या मोबाईलवर फोन करून राजापूर येथील फिडर लाईन लोडशेडिंगबाबत वाद घालत शिवीगाळ केली. त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे 6.50 वाजता पुन्हा फोन करून वाद घालण्यात आला. 

तक्रारीत पुढे म्हटले आहे की, सायंकाळी सुमारे 7.05 वाजता हासे हा थेट राजापूर उपकेंद्रात आला आणि कोणतीही परवानगी किंवा अधिकार नसताना उपकेंद्रातील वीज यंत्रणेत हस्तक्षेप केला, सरकारी कामात अडथळा निर्माण केला तसेच कर्मचाऱ्यांशी दमदाटी व आक्षेपार्ह वर्तन केले. त्याच्या या कृतीमुळे वीज वितरण व्यवस्थेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला असून सार्वजनिक हित बाधित झाल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे. 

या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल अशोक भिवाजी पारधी हे करीत आहेत. 

RRAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!