अहिल्यानगर जिल्ह्यात एलसीबीची कारवाई ; अवैध दारू, जुगार व मावा अड्ड्यांवर छापे

10 गुन्हे दाखल ; 2 लाख 97 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर | प्रतिनिधी –

स्थानिक गुन्हे शाखेने जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई करत जामखेड, सुपा, एमआयडीसी आणि तोफखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध दारू, जुगार व मावा विक्रीच्या अड्ड्यांवर धडक छापे टाकले. या कारवाईत 10 गुन्हे दाखल करण्यात आले असून 2 लाख 97 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार रिचर्ड गायकवाड, मनोज साखरे, प्रताप देवकाते, रोहित मिसाळ, दीपक जाधव, अमोल आजबे, राहुल द्वारके, प्रकाश मांडगे, विजय ठोंबरे, विष्णू भागवत, निळकंठ कारखिले, विशाल तनपुरे, विजय पवार, भीमराज खर्से, सागर ससाणे आणि रोहित येमुल यांची चार विशेष पथके तयार करून त्यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

त्यानुसार 5 ऑगस्ट 2026 रोजी या पथकांनी जामखेड, सुपा, एमआयडीसी व तोफखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील अवैध दारू, जुगार व मावा विक्री सुरू असलेल्या 10 ठिकाणी छापे टाकले. कारवाईदरम्यान संबंधितांविरुद्ध 10 गुन्हे दाखल करून 2 लाख 97 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

कारवाईचा तपशील

– जामखेड पोलीस ठाणे – अवैध दारूचे 2 गुन्हे, 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

– सुपा पोलीस ठाणे – अवैध दारूचे 2 गुन्हे, 11 हजार 630 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

– एमआयडीसी पोलीस ठाणे – अवैध दारूचे 3 गुन्हे, 12 हजार 640 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

– तोफखाना पोलीस ठाणे – अवैध दारूचा 1 गुन्हा, 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

– तोफखाना पोलीस ठाणे – जुगाराचा 1 गुन्हा, 2 हजार 290 रुपये जप्त.

– जामखेड पोलीस ठाणे – मावा व सुगंधी तंबाखू विक्रीचा 1 गुन्हा, 1 लाख 8 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त.

या मोहिमेत एकूण 8 दारूबंदी गुन्हे, 1 जुगाराचा गुन्हा आणि 1 मावा विक्रीचा गुन्हा अशा 10 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून एकूण 2 लाख 97 हजार 260 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात अशाच प्रकारच्या धडक कारवाया पुढेही सातत्याने सुरू राहणार असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेने स्पष्ट केले आहे.

RAJA VARAT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed

error: Content is protected !!